ठाणे : जुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमधील रहिवाशांना घरगुती गॅसची जोडणी द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
जुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अद्याप घरगुती गॅस वाहीन्यांची जोडणी देण्यात आलेली नाही. यामुळे घरगुती गॅस पुरवठा सेवेपासून येथील नागरिक वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आनंदाश्रम येथे एक बैठक घेतली. या बैठकीला रहिवाशांसह महानगर गॅस कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत म्हस्के यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत रहिवाशांना तातडीने वाहीनीद्वारे घरगुती गॅस जोडणी देण्याची सुचना केली.
नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस वाहिनीच टाकण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी गॅस वाहीनी जोडणीत मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी बैठकीत मांडल्या. या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या.
महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीने जबाबदारीने काम करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली. महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी पूर्ण करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे मागणी करण्यात आली, अर्ज दिले, बैठकाही घेण्यात आल्या. परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅस ऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.