कल्याण: महावितरणतर्फे अत्याधुनिक स्मार्ट मीटर (टाइम ऑफ डे) लघुदाब वीज ग्राहकांच्या घरी बसवले जात आहेत. कल्याण विभागात आतापर्यंत सुमारे एक लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांना हे मीटर बसवले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणे विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जात आहे.

या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणला मिळणार आहे. या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही. हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.स्मार्ट मीटर (टीओडी) मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे. त्यामुळे मीटरमधील वीज वापराची अचूक माहिती महावितरणकडे उपलब्ध होते.

मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तात्काळ महावितरण, ग्राहकाला मिळू शकेल. मीटरचे वाचन स्वयंचलित होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. स्वयंंचलित मीटर वाचनामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा, दिवसाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येइल.

मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

सध्या महावितरणने सर्व औद्योगिक ग्राहकांना टीओडी मीटर बसवलेले आहेत. त्यानुसार विशिष्ट कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना सवलत मिळते. याच धर्तीवर भविष्यात घरगुती ग्राहकांना विशिष्ट वेळी वीजवापर केला तर सवलत देण्याचे प्रस्तावित आहे. यात ग्राहकांचाच फायदा होईल. तसेच हे मीटर बसवल्याचा प्रचलित वीज दरांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे महावितरणने म्हटले आहे.

महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाईल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कल्याण मंडल एकमध्ये ४२ हजार ५५७, कल्याण मंडल दोनमध्ये ५३ हजार ९३५ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या दोन्ही विभागात एकूण ९६ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही विभागात अलीकडे एकूण २२ हजार ७८५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण कर्मचारी घरी स्मार्ट मीटर बसविण्यास आल्यास त्यांना सहकार्य करा, असे आवाहन महावितरणने केले आहे.