कल्याण -पनवेल येथील मस्तानी देशी दारू दुकानाचे लायसन्स आपल्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. हा प्रकार २४ जुलै २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात घडला.
तक्रारदार निलेश वारुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कल्याण मधील कल्पेश तारमळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारुळे हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खडक मळगावचे रहिवासी आहेत गुन्हा दाखल इसमाने पनवेल येथील मस्तानी देशी दारू दुकान, ज्याचे लायसन्स मूळ मालक मुकुंद म्हात्रे यांच्या नावावर आहे, ते त्यांच्या नावावर हस्तांतरित करून देण्याचे आमिष तक्रारदार यांना दाखवले. यासाठी इसमाने तक्रारदार आणि त्यांच्या भावाकडून वेळोवेळी १.४४ कोटी रुपये घेतले. त्यापैकी ६१ लाख रुपये मूळ मालकास दिल्याचा दावा इसमाने केला. मात्र उर्वरित रक्कम मूळ मालकाला परत दिली नाही किंवा लायसन्स हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
त्यामुळे पैसे परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने वारंवार इसमाकडे पाठपुरावा केला. इसमाने ९ एप्रिल २०२५ रोजी सारस्वत बँकेचा ४ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश खात्यात शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाला. त्यानंतर इसमाने १ मे २०२५ रोजी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील स्वतःच्या खात्याचा ५३ लाख रुपयांचा चेक दिला, पण तोही बँकेत पुरेशी शिल्लक नाही म्हणून परत आला. लायसन्स हस्तांतरित न करता आणि रक्कम परत न केल्यामुळे गुन्हा दाखल इसमाने हेतुपुरस्सर फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.