विरार-सीएसएमटी लोकलला लाल कंदील

सीएसएमटी-विरार लोकल सोडण्याची मागणी वसई-विरारचे प्रवासी अनेक वर्षांपासून करत आहेत.

virar-cst-local
सीएसएमटी-विरार लोकल सोडण्याची मागणी वसई-विरारचे प्रवासी अनेक वर्षांपासून करत आहेत.
तांत्रिक कारण देत पश्चिम रेल्वेने जबाबदारी झटकली

वसई-विरारच्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात थेट प्रवास करण्याची शक्यता पश्चिम रेल्वेने तांत्रिक कारण देत फेटाळून लावली आहे. हार्बर मार्गावरील गाडय़ा या मध्य रेल्वेकडून चालवल्या जातात. त्यामुळे ही सेवा देणे शक्य नाही, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

वसई-विरारसह, मीरा-भाईंदरमध्ये राहणारे हजारो प्रवासी सीएसटी, शिवडी, कॉटन ग्रीन आदी भागांत कामाला आहेत. दररोज सकाळी चर्चगेट गाडी पकडून हे प्रवासी वांद्रे स्थानकातून हार्बर मार्गाने सीएसटीपर्यंत प्रवास करतात, तर काही जण दादरला जाऊन सीएसएमटीला जातात. सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीतून वाट काढत वांद्रे स्थानकात उतरताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. संध्याकाळच्या वेळेत तर चर्चगेट व दादर येथून सुटणाऱ्या विरार लोकलमध्ये शिरण्याइतकीही जागा नसते. त्यामुळे अनेक लोकल सोडून द्याव्या लागतात. अनेकदा वांद्रे येथून चर्चगेटपर्यंत उलटा प्रवास करून विरार लोकल पकडावी लागते. त्यामुळे तासाभराचा प्रवास दीड ते दोन तासांवर जात असतो. लोकलच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी सीएसएमटी-विरार लोकल सोडण्याची मागणी वसई-विरारचे प्रवासी अनेक वर्षांपासून करत आहेत.

[jwplayer Qo3TnO1B]

याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना २ जानेवारी २०१७ रोजी एका निवेदन देऊन प्रवाशांना होणारा त्रास निदर्शनास आणून दिला होता. मात्र पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेवर जबाबदारी ढकलली आहे. हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा मध्य रेल्वे प्रशासनाकडून चालवल्या जातात. त्यामुळे हार्बर मार्गावर आम्ही गाडय़ा चालवू शकत नाही, असे उत्तर पश्चिम रेल्वेने दिले आहे. त्यावर वांद्रे, अंधेरी ही स्थानके पश्चिम रेल्वेच्या हद्दीत येतात, त्यामुळे विरारसह वांद्रे, अंधेरी हार्बर मार्गे रेल्वे सेवा सुरू करता येईल, असे चोरघे यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai cst to virar local train not possible due to technical reasons say western railway