ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात रविवारी सिमेंट मिक्सर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्याप्रमाणात कोंडी झाली होती. वाहनामध्ये १५ टन वजनाचे सिमेंट काँक्रीट होते. अपघातामुळे वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे भिवंडीहून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.

मुंबई नाशिक महामार्गावरील अंजुरगाव येथून सिमेंट मिक्सर वाहन घोडबंदरच्या दिशेने रविवारी सकाळी वाहतुक करत होता. वाहनामध्ये १५ टन वजनाचे सिमेंट काँक्रीट होते. हे वाहन सकाळी ११ वाजताच्या सुमारास खारेगाव टोलनाका परिसरात आले असता, चालक अरविंद गुप्ता याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाची धडक महामार्गावरील दुभाजकाला बसली. त्यामुळे वाहन उलटले.

घटनेची माहिती वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. पथकांनी उलटलेले क्रेन यंत्राच्या साहाय्याने सरळ केले. तसेच ते रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले.

या अपघातामुळे खारेगाव टोलनाका, खारेगाव खाडी पूल या भागात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे भिवंडी, नाशिक येथून ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीत अडकावे लागले. अपघात झाल्यामुळे रस्त्यावरती तेल आणि इंधन पसरले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशन दलाचे जवानांच्या मदतीने तेथे माती पसरवण्यात आली. त्यानंतर येथील मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.