मुंब्रा, दिव्यात कांदळवनावर घाला

ठाणे जिल्ह्य़ात पर्यावरणाचे अस्तित्व भूमाफिया आणि वाळूमाफियांमुळे धोक्यात आल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांत पुढे आली आहेत.

खारफुटींच्या अतिसंवेदनशील प्रजातींची कत्तल; जिल्हा प्रशासनाच्या पाहणी अहवालात कबुली

किशोर कोकणे
ठाणे : मुंब्रा येथील देसाई खाडीत अतिसंवेदनशील खारफुटीची कत्तल झाल्याचा प्रकार अखेर तहसीलदार आणि वन विभागाच्या संयुक्त पाहणी अहवालातून उघड झाला आहे. करोनाची दुसरी लाट ऐन भरात असताना या भागातील भूमाफियांनी खाडीत भराव टाकून मुंब्रा ते दिवा असा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता बांधल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या तहसीलदार आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीत खारफुटीची सोनचिप्पी (सोन्नेरेशिया अपेटला) आणि तिवर (एव्हिसेंनिया मरिना) या अतिसंवेदनशील प्रजाती नष्ट झाल्याचे समोर आले आहे. तर करंजवेल या कांदळवनाच्या सहयोगी वेलींचेही अस्तित्वही भूमाफियांनी नष्ट केले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात पर्यावरणाचे अस्तित्व भूमाफिया आणि वाळूमाफियांमुळे धोक्यात आल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांत पुढे आली आहेत. पुराच्या तसेच आपत्तीपासून रक्षण करणाऱ्या खाडीतील खारफुटींचे नष्ट करण्याचे काम तर वेगाने सुरू आहे. टाळेबंदीच्या काळात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भूमाफियांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. मुंब्रा येथील देसाई खाडीत भूमाफियांनी मुंब्रा येथील चुहा पूल ते दिवा येथील साबेगाव असा दोन किलोमीटर रस्ता तयार केला. या संदर्भाचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये ‘टाळेबंदीत खारफुटींची बेसुमार कत्तल’ या मथळ्याखाली १९ जून यादिवशी प्रसिद्ध झाले. त्यापूर्वी ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी सातत्याने क्रियाशील असलेले असंख्य कार्यकर्ते यासंबंधी आवाज उठवीत होते. तरीही दोन किलोमीटरचा बेकायदा रस्ता तयार होईपर्यंत जिल्हा प्रशासन ढिम्म होते. यासंबंधी दबाव वाढू लागल्याने उशिराने जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तहसीलदार युवराज बांगर यांनी संबंधित जागा मालकाविरोधात नोटीस काढून उत्तर देण्याचे कळविले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अभिप्राय देण्यास कळविले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या ठिकाणी खाडीत १० हून अधिक फूट उंच राडारोडय़ाचा भराव टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच याठिकाणी अतिसंवेदनशील अशा खारफुटींच्या प्रजातींपैकी सोनचिप्पी आणि तिवर ही खारफुटी नष्ट झाल्याचे आढळून आले. करंजवेल या कांदळवनाच्या सहयोगी वेलींचेही अस्तित्व नष्ट झाले आहे. खारफुटी नष्ट करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कोणती कठोर कारवाई केली जाणार आहे, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सोनचिप्पी, तिवर म्हणजे काय?

सोनचिप्पी आणि तिवर ही दोन्ही खारफुटींची प्रजाती आहेत. सोनचिप्पी ही सुमारे १५ मीटर उंच वाढते. खाडीचा प्रवाह कमी करण्यास ही खारफुटी महत्त्वाचे कार्य बजावते. सोनचिप्पीची फळे पक्ष्यांसाठी खाद्य असते. तर तिवर हे खाडीतील क्षाराचे प्रमाण नियंत्रणात ठेवत असते. दोन्ही खारफुटीच्या मुळाशी जलचरांचे अस्तित्व असते. खारफुटी मोठय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.

परिसर जलमय होण्यास कारण पावसामुळे दिवा, मुंब्रा आणि शिळफाटा या परिसरांत पाणी साचले. खाडीत रस्ता बांधल्यामुळे खारफुटी नष्ट झाल्या. त्यामुळेच खाडीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbra put in the lamp on kandalvana ssh