कळवा, दिवा, घोडबंदर परिसरातील तलावांचे रूपडे पालटण्यासाठी २८ कोटींचा खर्च

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : बेकायदा बांधकामांमुळे अस्तित्व नष्ट झालेल्या उथळसर भागातील जोगिला तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. आता त्याबरोबरच घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तलाव सुशोभीकरणाच्या कामासाठी २८ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या कामासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावास बुधवारी झालेल्या स्थायी समितीने मान्यता दिली.

ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. एकेकाळी ठाणे शहरात ७० हून अधिक तलाव होते. त्यापैकी शहरात आता फक्त ३४ तलाव शिल्लक राहिले असून उर्वरित तलावांचे अस्तित्व बेकायदा बांधकामामुळे नष्ट झाले. त्यामुळे शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. ठाणे शहरातील मासुंदा, कचराळी, सिद्धेश्वर, आंबेघोसाळे, उपवन तसेच अन्य तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच उथळसर येथील जोगिला तलावावर झालेली बेकायदा बांधकामे हटविण्यात आली आहेत.  या तलावांपाठोपाठ आता घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील तलावांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. तलावांच्या सुशोभिकरणासाठी महापालिका प्रशासानाने दोन प्रस्ताव तयार केले असून त्यापैकी एका प्रस्तावात घोडबंदर भागातील १३ तर दुसऱ्या प्रस्तावात  कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील १६ तलावांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली असून त्यातून अंतिम ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीने मान्यता दिली.

 

असे सुशोभीकरण होणार

फ्लोटिंग आर्ट तयार करणे, संगीतमय पद्घतीचे कारंजे बसविणे, तलावांच्या परिसरात पक्ष्यांसाठी घरटी तयार करणे, विविध माहितीफलक बसविणे, स्थापत्य कामे, विद्युत संबंधित कामे, लॅण्डस्केपिंग संबंधित कामे, स्त्री व पुरुषांकरिता शौचालय बांधणे, अशी कामे केली जाणार असल्याचे नगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal administration started beautification of thane lakes
First published on: 20-07-2018 at 03:14 IST