आशीष धनगर / भगवान मंडलिक

बंद असलेले अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रांची सोय असलेल्या खाटांची कमतरता आणि धूळखात पडलेली ‘पीएम केअर फंडा’तील कृत्रिम श्वसनयंत्रे हे कल्याण-डोंबिवली शहरांतील उपचारसेवेचे दशावतारी चित्र. करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होत असताना प्रभावी उपचारयंत्रणा उभारण्यात महापालिकेला अपयश आल्याचेच त्यातून स्पष्ट होते.

‘सांस्कृतिक शहरे’ अशी ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवलीत गंभीर लक्षणे असलेल्या करोना रुग्णांसाठी एप्रिलमध्ये लाखो रुपयांचा खर्च करत होलिक्रॉस रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र काही दिवसांतच तेथील अतिदक्षता विभाग बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. कृत्रिम श्वसन यंत्रणा बंद पडल्याने गंभीर लक्षणांच्या रुग्णांना प्रवेश नाकारला जाऊ लागला. श्वसन यंत्रे आणि ऑक्सिजन वाहिन्यांमध्ये बिघाडाचे कारण पुढे करण्यात आले. एवढेच नव्हे तर डोंबिवली जिमखान्यात कृत्रिम श्वसन यंत्रणांनी युक्त असे सुसज्ज १८० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. १५ जुलै रोजी ते सुरू केले जाईल अशी घोषणा करण्यात आली. मात्र या रुग्णालयाचे काम कासवगतीने सुरू आहे.

उद्घाटन सोहळ्यांचा केवळ धडाका

आरोग्य व्यवस्था उभारणीच्या नावाखाली काही दिवसांपासून दोन्ही शहरांमध्ये लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यांचा धडाका सुरू आहे. डोंबिवलीतील शीळ-कल्याण रस्त्यालगत पाटीदार भवन येथे महापालिकेने रुग्णालय सुरू केले. उद्घाटन होऊन १५ दिवस उलटले तरी तेथे सुसज्ज यंत्रणा उभारण्यात महापालिका अपयशी ठरली. या ठिकाणी औषधे ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणाही नव्हती, तर कल्याणच्या गौरीपाडा रुग्णालयात बरेच दिवस ऑक्सिजन सुविधा नव्हती.

रुग्णांच्या जिवाशी खेळ

महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात कृत्रिम श्वसन यंत्रांची सोय नाही. तेथील दोन यंत्रे दुसऱ्या एका रुग्णालयात नेण्यात आली. ‘पीएम केअर फंडा’तून महापालिकेस मिळालेली ३० कृत्रिम श्वसन यंत्रे अनेक महिन्यांपासून धूळ खात पडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डोंबिवली जिमखान्यातील काम सुरू असलेल्या रुग्णालयात ही यंत्रे बसवली जातील अशी सारवासारव महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली असली तरी यंत्रे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ करण्यात आला. होलिक्रॉस रुग्णालयातील कृत्रिम श्वसन यंत्रणा महिनाभर बंद असल्याच्या तक्रारी आहेत.

* एकूण प्रतिजन चाचण्या ७ हजार ९८९

* स्राव घेऊन चाचणी ४८ हजार

* स्राव चाचण्यांचे १३ हजार किट उपलब्ध

* प्रतिजन चाचण्यांचे २८ हजार किट उपलब्ध

* उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४०६२

* बरे झालेल्यांची संख्या १८ हजार ३२९

* एकूण मृत्यू ४५८

* रुग्णदुपटीचा कालावधी ५३ दिवस

* मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के

(संदर्भ-वैद्यकीय आरोग्य विभाग, कडोंमपा)

करोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. चाचण्यांची संख्या वाढवली आहे. यासाठी केंद्रे सुरू केली आहेत. प्रभागातील खासगी डॉक्टरांचे सहकार्य घेतले जात आहे. करोना रुग्णालय, विलगीकरण केंद्रात दाखल होताना रुग्ण, नातेवाईकांना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेतील जात आहे. करोना रुग्णाची काही तक्रार असेल तर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तेथे निराकरण न झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.

– डॉ. अश्विनी पाटील, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी

शहरातील आरोग्य व्यवस्थेचे िधडवडे निघाले असताना आणि रुग्णांची लूट सुरू असताना एकही नगरसेवक, आमदार, खासदार त्या विरोधात आवाज उठवत नाही. रुग्णांचा उपचारांचा प्रवास कल्याण-डोंबिवलीत अधिक वेदनादायी आहे. कृत्रिम श्वसनयंत्रे आणि अतिदक्षता कक्षात खाटा मिळणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी, उपचारांसाठी मुंबई, ठाण्यात जावे लागले आहे. लोकचळवळीद्वारे व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे.

– महेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ता, डोंबिवली