पालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत सेनेचे स्थानिक नेते अनुत्सुक

ठाणे : कळवा येथील खारेगाव भागातील रेल्वे उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टोलेबाजीनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून यातूनच अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नकोच असा सूर लावला आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर पत्रकार परिषदा घेऊन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यापाठोपाठ रविवारी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात; पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, अशा शब्दात परांजपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना चपराक लगावली. तसेच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांना नारदमुनीची उपमा दिली. पण हीच उपमा समजण्यात म्हस्के यांची चूकच झालेली आहे. कारण ते कलियुगातील नारद आहेत, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. त्यास महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेश जानकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांत होतो, पण वारंवार पत्रकार परिषदा घेऊन वाद पेटवणार असाल तर कलियुगातील कालींना पुरण्यासाठी नारदाची गरज आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.

महाविकास आघाडीबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील, पण असे आरोप-प्रत्यारोप होत असतील तर आघाडी नकोच, असे मत त्यांनी व्यक्त केले. आघाडी नकोच असे शिवसैनिकांचे म्हणणे असून ते पालकमंत्र्यांना कळविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवंगत खासदार प्रकाश परांजपेसाहेब यांचे विकासकामांसाठीचे योगदान सर्वश्रुत आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांची चप्पल त्याच्या मुलाला घालायला दिली होती, पण पित्याची चप्पल पुत्राच्या पायात बसली नाहीच, पण आपल्याच पित्याच्या चप्पलेचा अवमान करून दुसऱ्याची चप्पल डोक्यावर घेणाऱ्या या पुत्राला जनतेने दोन वेळा घरी बसविले याचे भान आता ठेवणे गरजेचे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासाचे बाळ सात वर्षांचे झाले असले तरी या बाळाने विकासकामांचा डोंगर मतदारसंघात उभा केला हे जनतेला ज्ञात आहे. एवढेच नव्हे तर सुरू असलेले प्रकल्प हे निश्चित वेळेत पूर्ण होतील. तेव्हा या प्रकल्पांच्या उद्घाटनांना गैरहजर न राहता वेळेवर उपस्थित राहा, असा टोला शिवसेनेच्या नगरसेवकांनी लगावला आहे.

परमार्थात स्वार्थ नसावा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोस्तीचे दाखले गृहनिर्माणमंत्री वारंवार देऊ लागले आहेत. मात्र या मैत्रीला त्यांनी स्वार्थाची झालर लावली आहे. केवळ आपले काम साध्य करण्यासाठी आणि निधी मिळविण्यासाठी आणि निवडणुकीत आघाडी करण्यासाठी हे दोस्तीचे दाखले देण्यात येत आहेत. हे जनतेला तर माहित आहेच पण पालकमंत्र्यांनासुद्धा ज्ञात आहे. त्यामुळे मैत्री करावी तर ती नि:स्वार्थी. आनंद पराजपे यांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर परमार्थात स्वार्थ नसावा, असा टोलाही शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी लगावला आहे.