कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गणेशोत्सव काळात आपल्या पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. आपल्या गोंगाट, दणदणाटापासून कोणालाही त्रास होणार नाही याची प्रत्येक गणेशभक्ताने काळजी घ्यावी. आणि डीजेमुक्त, पर्यावरणपूरक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त अभिनव गोयल आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिक आणि गणेशभक्तांना केले आहे.
गणेशोत्सव काळात जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही यादृष्टीने प्रत्येक गणेशभक्ताने काळजी घ्यावी. शाडुच्या गणपती मूर्तींची भक्तांनी प्रतिष्ठापना करावी. या मूर्तींचे आपल्या घर परिसरातील पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे, असे आवाहन आयुक्त गोयल यांनी केले आहे. गणेशोत्सव काळातील नियोजन विषयावर कल्याण डोंबिवली पालिका आणि पोलिसांनी शासकीय, पालिका, पोलीस अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केली होती.
या बैठकीत पर्यावरणपूरक गणपती उत्सवावर सर्वाधिक भर देण्यात आला. गणेशोत्सव मंडळांना पालिका, पोलिसांकडून आवश्यक मंजुऱ्या ऑनलाईन माध्यमातून परवानग्या देण्यात येत आहेत. महावितरणने स्थानिक महावितरण कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वीज पुरवठा घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन केले आहे. प्रभागस्तरावर पालिकेने एक खिडकी योजना सुरू केली आहे. या माध्यमातून एकाच ठिकाणी गणेशोत्सव मंडळांना अर्ज दाखल करणे आणि मंजुरीची प्रक्रिया करून दिली जाणार आहे.
गणेशभक्तांनी शाडुच्या मूर्तींच्या अधिक वापर करावा. सहा फुटापेक्षा कमी उंचीची मूर्ती पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित करावी, असे आवाहन आयुक्त गोयल यांनी केले. गणपती मिरवणुका पारंपारिक वाद्यांचा वापर करून ध्वनी प्रदूषण होणार नाही अशा पध्दतीने शिस्तपध्दतीने काढण्यात याव्यात. डीजे वाद्याचा वापर न करता शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्ताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले.
या बैठकीला आयुक्त अभिनव गोयल, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ, शहर अभियंता अनिता परदेशी, उल्हासनगर पालिकेतील अधिकारी, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावयाची आहे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.