भाईंदर : उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या २४ तासांत तिच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंजली सिंग (२३) असे महिलेचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या पती आणि दिराने केली असून, या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी एका सुटकेसमध्ये शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या धडाचे दोन तुकडे करून सुटकेसमध्ये टाकण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी परिमंडळ एकने ६ पथके तयार केली होती. पोलिसांनी अवध्या २४ तासांत या हत्येचा छडा लावून या महिलेच्या पती आणि दिराला अटक केली आहे. अंजली सिंग (२३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती नालासोपारा येथे रहाते. तीन वर्षांपूर्वी बिहारमध्ये असताना तिचे लग्न मिट्टू सिंग याच्यासोबत झाले होते. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. कामानिमित्त तिचा पती मुंबईला आला. तो नालासोपारा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. अंजली खुल्या विचारांची होती आणि समाजमाध्यमांवर सक्रीय होती. त्यामुळे मिट्टू सिंग याला तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला होता. यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाददेखील सुरू होते. २४ मे रोजी संध्याकाळी अशाच वादातून मिट्टू सिंग याने अंजलीचे शीर कोयत्याने कापले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धडाचे दोन तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले. भाऊ चुनचुन सिंग याच्या मदतीने ही सुटकेस भाईंदरच्या खाडीतून फेकली होती. दरम्यान मागील सात दिवसांत मिंटूने लहान मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी हैदराबाद आणि त्यानंतर नेपाळ असा प्रवास केला होता. यात मुलाला सासऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर तो नालासोपाऱ्याला असलेले पत्नीचे दागिने घेऊन पळ काढत असतानाच दादर रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

हेही वाचा –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॅटूच्या मदतीने झाली गुन्हाची उकल

सुटकेसमधील मृतदेहाच्या शरीरावर टॅटू होता. तसेच तिला बांधण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिक पिशवीवर नायगाव येथील पत्ता होता. त्यामुळे ही महिला नायगाव येथे राहत असल्याचा प्रथम संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर नायगाव येथील टॅटू काढणाऱ्याशी चर्चा केल्यानंतर हे टॅटू नायगाव येथेच काढले असल्याचे स्पष्ट झाले. यात या महिलेने टॅटू उधारीवर असल्यामुळे ती त्याच्या संपर्कात होती. शिवाय टॅटू काढतानाची चित्रफीत महिलेने समाज माध्यमावर टाकल्याने तीची ओळख पटवून घेण्यास पोलिसांना मोठी मदत झाली. गुन्हे शाखा १ चे प्रशांत गांगुर्डे, लांडे तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली