मुंबईपासून ठाणेपल्याड असलेल्या डोंबिवली-बदलापूपर्यंतची वाहतूक वेगवान व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेला नाहूर ते बदलापूर हा तब्बल ३३ किलोमीटर अंतराचा द्रुतगती मार्ग प्रत्यक्षात येण्याची चिन्हे असून या बहुचर्चित प्रकल्पासाठी सुमारे ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रकल्प’ (एमयूटीपी) अंतर्गत नाहूर ते ऐरोली आणि पुढे निळजे (डोंबिवली) ते बदलापूर अशी या महामार्गाची आखणी करण्यात आली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गापासून सुरू होणारा हा मार्ग नवी मुंबईवरून उड्डाण घेत पुढे बदलापूरच्या दिशेने सरकेल, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक, पुणे, कसारा, कर्जत भागांतून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कल्याण शिळफाटा, भिवंडी वळण रस्ता असे काही मोजके मार्ग आहेत. या रस्त्यांवरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाणही मोठे असते. ज्या संख्येने वाहने मुंबईच्या दिशेने जातात, तेवढय़ाच संख्येने ती मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. येत्या काही वर्षांत वाहनांचा भार सातत्याने वाढणार आहे. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नाहूर-ऐरोली-निळजे-बदलापूर असा मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली-कल्याण शहरांबाहेरून जाणारा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ‘ली’ असोसिएटच्या अहवालात या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे.
बदलापूर परिसरातील वाहने प्रस्तावित रस्त्याने थेट शहापूरजवळ नाशिक महामार्गाला जाऊन मिळतील. त्यामुळे मुंबईतून येणारी वाहने भिवंडी वळण रस्त्यावर जाणार नाहीत. नाहूर, बदलापूर द्रुतमार्गाने थेट नाशिकच्या दिशेने हा प्रवास होऊ शकेल, अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली. कर्जत, कसारा, खोपोली भागांतून मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांना शिळफाटा, भिवंडी वळण रस्त्यापेक्षा नवीन रस्ते पर्याय उपलब्ध होतील, असेही पातकर म्हणाले.

* मुंबई शहर परिसरातील वाहने भांडुप, विक्रोळी द्रुतगती महामार्गाने नाहूर येथून थेट द्रुतगती महामार्गावरून बदलापूरच्या दिशेने येतील.
* तेथून ही वाहने अंतर्गत रस्त्याने नियोजित ठिकाणी निघून जातील, अशी या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nahur badlapur road work speed up
First published on: 28-01-2015 at 09:39 IST