खारफुटीची कत्तल करून त्याजागी लागवड; कारवाई करण्याची मागणी

नायगाव पश्चिमेकडील भागात खाडीकिनारी तिवरांची कत्तल करून तिथे मातीचा भराव टाकण्यात आला होता. भराव टाकलेल्या जागी आता भूमाफियांकडून नारळाची झाडे लावण्यात आली आहेत. नैसर्गिकरित्या येथे तिवरांची झाडे असणे आवश्यक आहेत, त्यामुळे हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तिवर क्षेत्रापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण न्यायालयाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत नायगाव परिसरात मोठया प्रमाणात तिवरांच्या झाडांची कत्तल करून अनिधकृत बांधकामे केली जात आहे. नायगाव पश्चिमेकडे पुलाच्या शेजारी असलेल्या उमेळा येथे सव्‍‌र्हे क्रमांक ६० पैकी काही क्षेत्रातील तिवरांवर संबंधित व्यक्ती मार्फत मातीचा भरणा करण्यात आला होता.  हा भरणा मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला असून येथील तिवरांच्या झाडांचा संपूर्ण पट्टा नष्ट करण्यात आला आहे. येथील तिवरांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून गेल्या १ ते दीड महिन्यापासून तिवरांवर भराव टाकण्याचा प्रकार रात्रीच्या वेळी चालत होता. ही बाब वसईच्या तत्कालिन तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये गोविंद घरत, सूर्यकांत घरत, गोविंद ससाणे, माधव मिश्रा, अरविंद सिंग, अर्चना सिंग, आणि जेसीबी मालक प्रशांत पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवला. मात्र येथे तिवरांची कत्तल सुरू असून भराव केलेल्या जागेवर आता चक्क नारळाची झाडे लावण्यात आली आहेत. या भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

तत्कालीन तहसीलदारांनी कोणत्या प्रकारे कारवाई केली होती हे प्रथम जाणून घेऊन त्यानंतर या ठिकाणी तपासणी करण्यात येईल. त्यानंतर कायद्यांतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

किरण सुरवसे, वसई तहसिलदार