लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील पूर्व भागातील जागृती मंडळ संचलित शासन अनुदानित नालंदा प्राथमिक विद्यालयातील एक शिक्षिका शोभा खैरनार यांनी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) आणि इतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन शाळेत २८ वर्षापूर्वी नोकरी मिळवली. त्या आधारे शासनाचे वेतन आणि इतर लाभ घेऊन संस्था आणि शासनाची फसवणूक केली आहे.

आरोपी शिक्षिकेच्या कागदपत्रांची वेळीच पडताळणी न करता त्यांना अभय देण्यात नालंदा विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका चारुशिला चौधरी, लिपिक बलराम मेश्राम (आता कार्यरत जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, ठाणे) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. याप्रकरणी शाळेचे माजी अध्यक्ष ललित हुमणे यांनी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने कोळसेवाडी पोलिसांनी सहशिक्षिका खैरनार, चौधरी आणि मेश्राम यांच्या विरुध्द शनिवारी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा… विरारमध्ये अ‍ॅसिड हल्ला, व्यावसायिक जखमी, दोन हल्लेखोर फरार

कल्याण पूर्वेत न्यू जिम्मी बागमध्ये नालंदा प्राथमिक विद्यालय आहे. जागृती मंडळाच्या माध्यमातून या शाळेचा कारभार केला जातो. ही शाळा अनुदानित आहे. या शाळेत जून १९९४ मध्ये शोभा खैरनार सहशिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. खैरनार यांच्या शिकविण्याच्या क्षमतेबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष ललित हुमणे आणि इतर सद्स्यांना संशय आला. खैरनार विद्यार्थ्यांना योग्यरितीने शिकवत नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. सदस्यांनी खैरनार यांची सेवा पुस्तिका उपलब्ध करुन देण्याची मागणी लिपिक मेश्राम, मुख्याध्यापिका चौधरी यांच्याकडे केली. त्यांनी सेवापुस्तिका उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली. खैरनार निवृत्त होईपर्यंत ती पुस्तिका सदस्यांच्या हाती लागणार नाही अशी व्यवस्था केली.

हेही वाचा… आयरेतील २४ बेकायदा इमारतींना नियमबाह्य वीज पुरवठा; म्हात्रेनगर, रामनगरमधील वीजपुरवठा दररोज खंडित

खैरनार यांची नोकरीला लागतानाच्या कागदपत्रांची सत्यता तपासण्याचा निर्णय संस्थेने घेतला. डहाणू कोसबाड हिल येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाला खैरनार आपल्याकडे डी. एड. झाल्या आहेत का, याची विचारणा संस्थेने केली. त्यांनी अशी विद्यार्थीनी संस्थेत नव्हती असे कळविले. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे संस्थेने खैरनार यांच्या डी. टी. एड. प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्यांनीही ही विद्यार्थीनी आमच्या संस्थेत नव्हती असे कळविले. खैरनार यांनी संस्थेत शिक्षिका पात्रतेसाठी दाखल केलेली शालांत प्रमाणपत्र, डी. एड., डी. टी. एड. प्रमाणपत्र, गुणपत्रिका बनावट असल्याचे उघड झाले. मेश्राम यांनी खैरनार यांची कागदपत्रे त्यांच्या पतीने दाखल केली असल्याची माहिती संस्थेला दिली. खैरनार यांना संस्थेने गेल्या वर्षी सेवेतून बडतर्फ केले.

हेही वाचा… कल्याणमधील आ. गणपत गायकवाड यांची समाज माध्यमातून बदनामी करणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खैरनार यांची शैक्षणिक कागदपत्रे बनावट आहेत हे माहिती असुनही चौधरी, मेश्राम यांनी त्यांना साहाय्य केले, असा ठपका संस्थेने ठेवला.
शोभा खैरनार यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासन अनुदानित शाळेत नोकरी मिळवून शासनाचा पगार घेतला. शासन, संस्थेची फसवणूक केली म्हणून माजी अध्यक्ष हुमणे यांनी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशावरून कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी शोभा खैरनार (५८, रा. तारांगण संकुल, स्वाती इमारत, वायलेनगर, कल्याण), चारुशिला दयाराम चौधरी (६२, काळु सोसायटी, कल्याण पूर्व), बलराम मेश्राम (५५) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.