सागर नरेकर
राष्ट्रीय महामार्ग, विविध राज्यमार्ग, मेट्रो, रेल्वे अशा विविध मार्गानी जोडणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत विविध पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करत शहरातील मालमत्ता प्रदर्शनाचा सोहळा एकीकडे रंगला असताना दुसरीकडे शहरात विविध भागांत विजेचा लपंडाव आणि पाण्याची टंचाई जाणवते आहे. शहर नियोजनात वीज आणि पाण्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट आहे. जुन्या आणि टाकाऊ झालेल्या यंत्रणा याचे एक कारण आहेच. सोबत वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक नियोजनाची टंचाईही यातून दिसते आहे.
मुंबई, ठाणे आणि आता कल्याण-डोंबिवलीपल्याड परडवणाऱ्या घरांचा उत्तम पर्याय देणारी शहरे म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर शहरांकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत परवडणाऱ्या घरांसोबतच मुंबईच्या धर्तीवर विविध सोयीसुविधा असलेल्या दर्जेदार आणि महागडय़ा घरांसाठीही अंबरनाथ आणि बदलापूर शहरांकडे अनेकांनी मोर्चा वळवला आहे. निसर्गसंपन्न वातावरण, हवीहवीशी मोकळीक, निसर्ग पर्यटनाचे विविध पर्याय आणि रस्तेमार्गाने जोडले गेल्याने दोन्ही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर नागरिकांनी स्थलांतर केले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे विस्तारत असली तरी शहरांचा कारभार अ वर्ग नगरपालिका प्रशासन हाकते आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत शहरातील विविध योजना, पायाभूत सुविधा यांचे प्रदर्शन करत शहरात उपलब्ध असलेल्या घरांचे सादरीकरण नुकतेच केले. एकीकडे शहराबाहेरील ग्राहक शहरांतील नियोजित प्रकल्प आणि घरे पाहण्यासाठी येत होता, तर शहरात पूर्वीपासूनच वास्तव्यास असलेले रहिवासी मात्र विजेचा लपंडाव आणि पाणीटंचाईला सामोरे जात होते. शहराला राज्यातील इतर शहरे, महानगरे, बंदरे, राष्ट्रीय महामार्ग यांच्याशी विविध मार्गानी जोडण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतानाच शहरात प्राथमिक सोयीसुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरे विस्तारत असताना त्याच क्षमतेची, त्याच तोडीची यंत्रणा शहराला देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठय़ाची व्यवस्था पाहते आहे. त्यात बदलापूर शहरातील उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून बहुतांश पाणीपुरवठा केला जातो. त्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चिखलोली धरण आपला वाटा देत असतो. मात्र शहराच्या विस्तारित भागात आजही पुरेशा जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. विविध कारणांमुळे ही कामे रखडलेली आहेत. पालेसारख्या विस्तारित अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या योगदानाने जलकुंभ उभारूनही अनेक वर्षे तो सुरू करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश आले होते. त्यामुळे घरांमध्ये स्थलांतरित होऊनही अनेक वर्षे रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. अंबरनाथ शहराच्या पालेगाव, मोरीवली पाडा, चिखलोली, कोहाजगाव या परिसरांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा कमी आहे. बहुतांश भागात अनेक इमारतींना पिण्याच्या पाण्याची साधी जोडणी नाही. तर ज्या भागात जोडण्या झाल्या आहेत त्या भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागवण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून पाण्याचे जार पुरवले जात आहेत. नळजोडण्यांअभावी बांधकाम व्यावसायिकांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. हीच परिस्थिती शहराच्या जुन्या वस्त्या असलेल्या अंबरनाथमधील कोहोजगाव, खुंटवली, कमलाकर नगर, जावसई, बुवापाडा, शिवाजी नगर, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मोरीवली पाडा, कानसई, मोतीराम पार्क आदी भागांतही पाहायला मिळते आहे.
बदलापूर शहरातही वेगळी परिस्थिती नाही. शहराच्या विस्तारित शिरगाव, आपटेवाडी, कात्रप, मांजर्ली, वालिवली, बेलवली भागांत अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. उंचसखल भागात ही परिस्थिती आणखी भीषण आहे. अनेक नव्या इमारतींना अजूनही पाण्याची नळजोडणी नाही. त्यामुळे त्या ठिकाणी टँकरशिवाय पर्याय नाही. उन्हाळय़ात अनेक गृहसंकुलांच्या कूपनलिका कोरडय़ा होत असल्याने संपूर्ण भार जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावरच असतो. त्यामुळे टंचाईची परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये पाणीपुरवठा योजना स्वतंत्रपणे राबवण्याची मागणी होते आहे. दोन्ही शहरांमध्ये पाणीगळती आणि चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांवर आहे. अनेक ठिकाणी नव्या जलवाहिन्या टाकल्या असताना जुन्याही जलवाहिन्या कार्यरत आहेत. पाण्याचा दाब राखण्यासाठी विशेष योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी मंजूर पाणी योजना वेळेत मार्गी लावण्याची नितांत गरज आहे.
पाणीपुरवठय़ातील दोष हे पाणीटंचाईचे प्रमुख कारण असले तरी विजेचा प्रश्नही याला काही अंशी कारणीभूत आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा हा पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरते आहे. सोबतच आलेले पाणी वितरित करण्यात येणाऱ्या अडचणीही याच विजेच्या लपंडावामुळे उद्भवत आहेत. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्राधान्याने काम करण्याची गरज आहे. पाणीपुरवठा यंत्रणेप्रमाणे महावितरणची यंत्रणाही अद्ययावत करण्याची गरज आहे. अनेकदा जुनाट यंत्रणेशी दोन हात करताना महावितरणच्या यंत्रणेची कसोटी लागते. गेल्या काही वर्षांत विजेचे खांब कोसळणे, वाहिन्या तुटणे आणि पुरवठा ट्रिप होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. उन्हाळय़ात आणि पावसाळय़ात याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.
महापालिकांकडे वाटचाल करणाऱ्या या शहरांतील पाणी आणि वीजपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. दोन्ही शहरांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची गरज आहे. बदलापूर शहरातील एक पाणीपुरवठा योजना अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. नवे जलकुंभ, नव्या जलवाहिन्या, भोज धरणातून थेट पाणीपुरवठा हे प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठय़ाचा स्रोत असलेल्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम वेळेवर मार्गी लागण्याची गरज आहे. नव्या जलकुंभांमुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम होणार आहे. गळती, चोरी रोखून प्रामाणिक ग्राहकांना पुरेसे पाणी देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. अन्यथा नव्याने शहरात आशेने स्थायिक होण्यासाठी येणाऱ्या नव्या नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.