ठाणे : राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याची सक्ती केली होती. त्यास राज्यात सर्वत्र विरोध झाला होता. पण, विरोधानंतर राज्य सरकारने सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. असे असले तरी यानिमित्ताने मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून यातून मनसेने कार्यकर्त्यांकडून परप्रांतीयांना मराठीत बोलण्याची सक्ती केली जात आहे. त्यापाठोपाठ आता नवी मुंबईत मनसेने थेट सत्ताधारी भाजपला इशारा देत सीवूड्समधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची गुजराती भाषेत असलेली पाटी मराठी भाषेत करण्यास सांगितले आहे.

राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याची सक्ती केली होती. त्यास राज्यात सर्वत्र विरोध झाला होता. त्याविरोधात सर्वच स्तरातून विरोधातील प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू आक्रमक झाले होते. त्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचे ठरविले होते. मात्र, त्याआधीच सरकारने हा निर्णय मागे घेतला. यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा आयोजित केला होता. असे असले तरी यानिमित्ताने मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून यातून मनसेने कार्यकर्त्यांकडून परप्रांतीयांना मराठीत बोलण्याची सक्ती केली जात आहे.

मिरारोडमधील एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. त्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यापुर्वी सरकारी नियमानुसार मनसेने दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याचा आग्रह धरत आंदोलने केली होती. आता मनसेने पुन्हा मराठी पाटीचा आग्रह धरत थेट सत्ताधारी भाजपला इशारा दिला आहे.

प्रकरण काय आहे ?

नवी मुंबई, सीवूड्स, सेक्टर-४२ मध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत आहे. गुजरातमधील आमदार विरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांचे हे कार्यालय आहे. या संदर्भात माहिती मिळताच संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी मनसे शहर सचिव सचिन कदम हे विभाग सचिव अप्पासाहेब जाधव, उपविभागअध्यक्ष संतोष टेकवडे आणि इतर सहकाऱ्यांसह गेले. त्यावेळी कार्यालयातील लोकांनी दरवाजा आतून बंद केला. यावरून कदम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेने दिला इशारा

“अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. परंतु आम्हाला शहराचे वातावरण खराब करायचे नाही. नवी मुंबईत सर्वांनी मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा मान ठेवावा आणि सर्वांनी गुण्या गोविंदाने राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे.” अशी प्रतिक्रिया सचिन कदम यांनी व्यक्त केली. संबंधित बाब भाजप मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांस कळविली आहे. आज सांयकाळपर्यंत पाटी मराठीत होईल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास मनसे आक्रमक रूप धारण करेल असा इशारा सचिन कदम यांनी दिला.