ठाणे : सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी. हे त्यांना खुले चॅलेंज आहे. आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगड मध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती असताना जिल्हा परिषद मध्ये केलेले घोटाळे बाहेर काढू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आनंद परांजपे यांनी शिंदे सेनेला दिला.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विधाननंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर टीका केली. रायगड मधल्या ‘थ्री इडियट्स’ मधल्या एका ‘इडियट्स’ने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली. खरंतर रायगड मधील पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे असा टोला परांजपे यांनी गोगावले यांना लगावला.
सुनील तटकरे यांच्या घरामध्ये दुःख आल्यानंतर ते अद्याप संपूर्ण कुटुंब त्यातून निघाले नाही. तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या ‘थ्री इडियट्स’कडून सुरु आहे. विधानसभेत देखील तटकरे युती धर्माचे पालन केले. मात्र केले नसते तर भरत गोगावले काय दोन उमेदवार पडले असते अशी टीका देखील त्यांनी केली. सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी. हे त्यांना खुले चॅलेंज आहे. आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगड मध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती असताना जिल्हा परिषद मध्ये केलेले घोटाळे बाहेर काढू असेही ते म्हणाले.
रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे चूकीचे
ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली. राजकारणात वर आणले, त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेत काम केले आहे. रश्मी ठाकरे या कुटुंब वत्सल आहेत. राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा. जर शिवसेनेने मोठे केले आणि अशा वेळेस रश्मी वहिनी यांच्याविषयी आरोप करतील तर ते दुर्दैव आहे असेही ते म्हणाले.