विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे विरोधी संकल्पना नसून त्या एकमेकांना पुरक गोष्टी आहेत. विकास करताना पर्यावरण संवर्धनही करता येऊ शकते. त्यासाठी पर्यावरण साक्षरतेची आवश्यकता असून पर्यावरण साक्षरता भविष्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. समर्थ भारत व्यासपीठाच्यावतीने ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये भरविण्यात आलेल्या ग्रीन आयडिया प्रदर्शनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये जावडेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
भविष्यकाळामध्ये इ-कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होणार असून सध्या देशभरामध्ये ९० कोटींपेक्षा जास्त मोबाईलधारक आहेत. या मोबाईल धारकांचे मोबाईल पुढील दोन वर्षांमध्ये जुने होत असल्याने त्याचे कचऱ्यात रुपांतर होत असून या कचऱ्याचे विघटन करणे खुप महत्वाचे आहे. हे विघटन शास्त्रोशुध्द पध्दतीने होण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असून पर्यावरण मंत्रालयाकडून ही कारवाई केली जाईल. पर्यावरण रक्षण घनकचरा व्यवस्थान, इ-कचरा व्यवस्थापन, वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड यांच्याशी निगडीत असून या संदर्भात देशाचे योग्य धोरण आखले गेले नव्हते. त्यामुळे त्यामध्ये बऱ्याच तृटी होत्या. या धोरणांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला आहे.
मानव निर्मिती जंगल ही भविष्यातील गरज असून वनखात्याच्या अख्त्यारीतील जमिनींन व्यतिरीक्त महापालिका क्षेत्रातील जमिनींवरही जंगले उभारण्याची गरज आहे. यासाठी एका महत्वकांक्षी योजनेचा शुभारंभ पुण्यात होत असून भविष्यात देशभरातमध्ये त्याची अमंलबजावणी करण्यात येईल, असे जावडेकर यांनी सांगितले.