जिल्हा रुग्णालयातील केवळ १२ मृतदेह ठेवण्याची परवानगी; सात दिवसांत ओळख पटवणे पोलिसांना बंधनकारक

ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात १२ बेवारस मृतदेहांपेक्षा एकही अतिरिक्त मृतदेह ठेवला जाणार नाही, अशी तंबी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ठाणे तसेच ग्रामीण, पालघर आणि रेल्वे पोलिसांना दिली आहे. १२ मृतदेह ठेवण्याइतकीच जागा शवागृहात उपलब्ध आहे. असे असताना या ठिकाणी २० हून अधिक बेवारस मृतदेह ठेवण्यात येत होते. या मृतदेहांची विल्हेवाटही वेळेत लावली जात नाही. या पार्श्वभूमीवर सात दिवसांपेक्षा अधिक काळ एकही मृतदेह ठेवता येणार नाही, असेही प्रशासनाने बजाविले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त कळवा, कल्याण, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबई या शहरांत शवागृहाची व्यवस्था आहे. यापैकी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागृहात १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. असे असले तरी या शवागृहात २३ बेवारस मृतदेह कोंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या वेळी शवागृहातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) अचानक बंद पडून परिसरात दुर्गंधी पसरल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी शवागृहात सहा महिन्यांपासून ठेवण्यात आलेले बेवारस २३ मृतदेह काढण्याच्या सूचना ठाणे शहर- ग्रामीण, पालघर आणि  रेल्वे पोलिसांना दिल्या होत्या. त्यानंतर अवघ्या २४ तासांत शवागृहातील या २२ बेवारस मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊ न अंत्यसंस्कार उरकले होते. दरम्यान असा प्रकार वारंवार घडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय

म्हणून ठाणे शहर- ग्रामीण, पालघर आणि रेल्वे पोलिसांना १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता असणाऱ्या शवागृहात १२ पेक्षा एकही मृतदेह ठेवता येणार नाही, असे पत्र नुकतेच दिले आहे. तसेच या शवागृहात एकही मृतदेह सात दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवला जाणार नाही, असेही त्यांनी पोलिसांना या पत्राद्वारे कळवले आहे. सध्या या शवागृहात सात ते आठ मृतदेह ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

पोलिसांसमोर आव्हान

जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागृहात जास्तीत जास्त सात दिवसच मृतदेह ठेवण्याची अट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून घालण्यात आली आहे. त्यामुळे बेवारस मृतदेहाची ओळख सात दिवसांच्या आत पटवण्याचे आव्हान हे पोलिसांसमोर असणार आहे. दरम्यान सात दिवस उलटूनही बेवारस मृतदेहाची ओळख पोलिसांना पटवता आली नाही, तर पोलिसांना मृतदेह घेऊ न जाण्यास सांगण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.

बेवारस मृतदेह आढळल्यानंतरची प्रक्रिया

बेवारस मृतदेह आढळल्यास पोलीस त्या मृतदेहाचे छायाचित्र काढतात आणि ते छायाचित्र संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यात पाठवितात. त्याआधारे मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलीस करतात. आठ दिवसांनंतरही नातेवाईकांचा शोध लागला नाही तर, पोलीसांकडून बेवारस मृतदेह घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. या प्रक्रियेनंतर आणखी काही दिवस नातेवाईकांची वाट पाहण्यात येते. मात्र, त्यानंतरही नातेवाईकांचा शोध लागला नाही तर, त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.