ठाणे : भारतातील फळबाजार क्षेत्रात पहिल्यांच न्यूझीलंडमधून आणलेले प्रीमियम रूज प्रजातीचे सफरचंद दाखल झाले आहेत. वाशी येथील एपीएमसी फळबाजारात या प्रजातीच्या सफरचंदाचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला. भारतातील या सफरचंदाचा हा पहिलाच प्रवेश असून यामुळे भारत-न्यूझीलंड कृषी व्यापारसंबंधांना नव्याने बळकटी मिळाली आहे.

वाशीतील नवी मुंबई कृषी बाजार समितीत वर्षभर विविध फळांची आवक होत असते. यामध्ये हंगामानुसार विविध प्रजातींची फळे उपलब्ध होत असतात. अशातच एपीएमसीमध्ये वर्षभर विविध परदेशी फळे देखील दाखल होत असतात. फळ बाजारात शिमला, हिमाचल प्रदेशमधील सफरचंद येत असतात. अशातच भारतातील फळबाजार क्षेत्रात पहिल्यांदाच न्यूझीलंडमधून आणलेले प्रीमियम ‘रूज’ प्रजातीचे सफरचंद गुरूवारी वाशी येथील एपीएमसी फळबाजारात दाखल झाले.

रूज सफरचंदाच्या लाँच सोहळ्याला न्यूझीलंडचे मुंबईतील वाणिज्य दूत आणि व्यापार आयुक्त ग्रॅहम राउस, भारत-दक्षिण आशियाचे उपआयुक्त इरफान जाफर, एनझेडटीई (NZTE) च्या व्यवसाय विकास व्यवस्थापिका वृंदा सोनवणे, एपीएमसी वाशीचे संचालक संजय पानसरे, फळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धोळे हे उपस्थित होते. अलीकडेच न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांनी भारताला दिलेल्या भेटीत कृषी क्षेत्र, मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक संधींवर झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या सफरचंदाच्या लाँचला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कृषी क्षेत्र हे दोन्ही देशांमधील सहकार्याचे प्रमुख दुवे ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान लक्झन यांनी कृषी क्षेत्राला दिलेले प्राधान्य कामासाठी प्रेरणादायी ठरले. रूज सफरचंदाचे पदार्पण हे केवळ व्यावसायिक यश नसून भारत-न्यूझीलंड भागीदारीतला नवा टप्पा असल्याचे मत डी. बी. उर्सल अॅण्ड ग्रँडसन्सचे रोहन सतीश उर्सल यांनी सांगितले. तसेच रूज सफरचंद हे लालसर, नैसर्गिक गोडसरपणा असलेले फळ असून भारतीय ग्राहकांकडून याला अधिकची मागणी असेल असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या फळ व्यापार इतिहासावर बोलताना चंद्रकांत धोळे यांनी अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेचा उल्लेख केला. एपीएमसी वाशी आता आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक ठरत असल्याचे संजय पानसरे यांनी सांगितले. ग्रॅहम राउस यांनी फक्त सहा महिन्यांत ‘रूज’ सफरचंद भारतात दाखल होणे हे कौतुकास्पद असून भारत हा न्यूझीलंडसाठी सर्वाधिक संभाव्य बाजार असून भविष्यातील सहकार्याची मोठी संधी असल्याचे सांगितले.