ठाणे : ठाणे पोलीस दलातील नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातून ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी न्यायबंदींना आणताना गंभीर त्रुटी झाल्याने ही कारवाई करण्यात आली. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हेतूपुरस्सरित्या वरिष्ठांची दिशाभूल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सात न्यायबंदींना ४ ऑगस्टला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होते. त्यासाठी ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. साध्या वेशात एका पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, तपासणीत सातपैकी दोन कैदी आढळून आले नाहीत. मात्र, चौकशीत समजले की ते फरार झाले नव्हते, तर त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले होते, जे नियमांचे उल्लंघन होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करून सांगितले की ते न्यायबंदी एक्स-रे रूममध्ये किंवा स्वच्छतागृहात आहेत. दरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांच्या ठिकाणाविषयी टाळाटाळ व दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने अधिकाऱ्यांना संशय निर्माण झाला. हे दोन्ही कैदी नंतर पोलिसांना आढळून आले. सर्वांना पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात परत आणण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर पोलीस उपायुक्त डाॅ. पवन बनसोड यांनी नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.