|| ऋषिकेश मुळे
शासकीय कर्मचाऱ्यांकडून पाठ दुखतेय, पाळीव प्राणी आजारी अशी कारणे:- विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक कामातून नाव वगळावे यासाठी वेगवेगळ्या शासकीय व्यवस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज ५०० ते १००० अर्ज दाखल होत असून यासाठी पुढे केली जात असलेली कारणेही मजेशीर आहेत. पाठदुखी, कंबरदुखी या कारणांसोबत घरातील पाळीव प्राणी आजारी असल्याने निवडणूक कामासाठी हजर होता येणे शक्य नाही असे अर्ज दिले जात आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांत पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेचे संपूर्ण काम अंतिम टप्प्यात आले असून जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले होते. असे असले तरी सध्या जिल्हा प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ठाणे जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी एकूण ५४ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यामध्ये ४१ हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये, तर इतर १२ हजार कर्मचारी कार्यालयीन कामासाठी लागत आहेत. निवडणूक प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू असून या प्रशिक्षणास कर्मचाऱ्यांची मोठी गळती दिसून आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांच्या या गैरहजेरीवरून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी तरी हे कर्मचारी उपस्थित राहतील की नाही अशी चिंता वाटू लागली आहे.
अनेक कर्मचाऱ्यांनी नियुक्तीतून नाव वगळण्यात यावे याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीच्या कामाचे आदेश रद्द करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर्मचारी हेलपाटे घालू लागले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाचा वेळ वाया जाऊ लागल्यामुळे एक विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करून या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेतून नाव वगळण्यात यावे याकरिता सादर होणाऱ्या अर्जामध्ये कंबरदुखी, पाठदुखी, डोकेदुखी या दुखण्यांच्या कारणांसोबत घरचे कुत्रे, इतर पाळीव प्राणी आजारी असल्याचेही काही कर्मचाऱ्यांकडून कारणे देण्यात आली आहेत. काही कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याचे कारण दिले आहे, तर काही कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाचे ठिकाण दूर असल्याचे कारण दिले आहे.
नियमानुसार यांना सूट
पाच महिन्यांवरील गरोदर महिला किंवा तीन महिन्यांपेक्षा लहान पाल्य असलेल्या माता, कर्करोग किंवा डायलिसिसग्रस्त व्यक्ती, जिल्ह्य़ाबाहेर बदली झालेले कर्मचारी किंवा ५० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले कर्मचारी ही पाच कारणे असल्यास निवडणुकीच्या कामातून कर्मचाऱ्याला वगळण्यात येणार आहे.
अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई
निवडणूक कार्यक्रमादरम्यान जिल्ह्य़ात नियुक्त करण्यात आलेले जे कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहतील अशा कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
निवडणूक कार्यक्रम प्रशिक्षणाला अनेक कर्मचारी गैरहजर राहत आहेत. सादर होणाऱ्या अर्जाची पूर्ण माहिती घेतली जात आहे. अर्जातील आणि अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीच्या कारणाचे तथ्य लक्षात घेऊन नियुक्ती करायची की नाही याविषयी योग्य ती भूमिका घेतली जात आहे.– डॉ. शिवाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे