ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकिक असणाऱ्या कल्याण शहराची ओळख आता बहुभाषिक शहर म्हणून होत आहे. मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा अभ्यास व्हावा, वाचन संस्कृती टिकून रहावी, या अनुशंगाने सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने येत्या गुढीपाडव्याला स्वतंत्र इंग्रजी वाचनालय कल्याणकरांसाठी खुले होणार आहे. ललित साहित्यावर आधारित (फिक्शन) आणि सत्य घटनांवर आधारित (नॉन फिक्शन) पुस्तकांची पर्वणी या निमित्ताने तरूण वाचकांसमोर चालून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांना उत्तमोत्तम ग्रंथालय आणि वाचन संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. कल्याणातील सार्वजनिक वाचनालय हे या परंपरेतील मैलाचा दगड ठरला आहे. परंतु इंग्रजी भाषेतील संदर्भ साहित्य वाचण्यासाठी कल्याण शहरातील वाचकांना थेट मुंबई गाठावे लागत होते. त्यामुळे कल्याणकर वाचकांकडून शहरामध्ये इंग्रजी ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती.

दर्जेदार मराठी साहित्य, संदर्भ ग्रंथ हे या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ राहीले आहे. हजारो वाचक सभासदांकडून अगदी नित्यनेमाने या वाचनालयाचा उपयोग केला जातो. ७० हजारांहून दर्जेदार मराठी ग्रंथसंपदेने येथील वाचक प्रेमींना नेहमीच भुरळ पाडली आहे.  तरी काळाची पाऊले ओळखून वाचनालयातील व्यवस्थापनाने  रामबाग परिसरात इंग्रजी ग्रंथालय साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

रामबाग परिसरात मराठी लोकवस्तीपेक्षा दाक्षिणात्त्य, ख्रिश्चन आदी नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे. याच परिसरात इंग्रजी शाळाही आहेत. त्यामुळेच रामबाग परिसराची निवड इंग्रजी ग्रंथालयासाठी करण्यात आली, असे सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना सांगितले. शिक्षणाचा, वाचनाचा कल इंग्रजीकडे आहे. या दृष्टीकोनातून ही पुस्तके विद्यार्थ्यांंना उपलब्ध व्हावीत, अभ्यास व्हावा या हेतूने इंग्रजी ग्रंथालय सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनालयाचे सध्या ३५०० वाचक असून त्यापैकी सुमारे १५०० वाचक महाविद्यालयीन वयोगटातील आहेत. त्यामुळे या वाचकांना इंग्रजी ग्रंथालयाचा नक्की फायदा होईल, असे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी सांगितले.\

कोणती पुस्तके?

इंग्रजी वाचनालयात शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य सर्व इंग्रजी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये निरनिराळ्या कल्पित साहित्यावर (फिक्शन) आधारित आणि सत्य घटनांवर (नॉन फिक्शन) आधारित पुस्तकांचा समावेश असणार आहे. सुरूवातीच्या काळात ५००० पुस्तकांचा समावेश या ग्रंथालयामध्ये असेल. त्यानंतर वाचकांच्या मागणीनुसार संख्येमध्ये वाढ केली जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now kalyan book readers get english book
First published on: 01-01-2016 at 03:05 IST