कल्याण : आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी दोन दिवसांपासून संप सुरू केला आहे. आपल्या मागण्या शासनाकडून मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ओला, उबर चालकांनी केला आहे. अशाही परिस्थितीत काही ओला, उबर चालक प्रवासी वाहतूक करत असल्याने कल्याणमधील दुर्गाडी किल्ला चौक येथे त्यांना थांबवून ठाकरे गटाचे वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष नीलेश भोर यांच्या उपस्थित हार, श्रीफळ देऊन गांधीगिरी करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या आता मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात आपणास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे सुरू असलेल्या संपात सहभागी व्हा, असा संदेश या चालकांना देण्यात आला. ओला, उबर मोटार चालकांचा संप सुरू असुनही अनेक उबर, ओला चालक या संपात सहभागी न होता प्रवासी वाहतूक करत आहेत, अशी माहिती उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नीलेश भोर यांना समजली. गुरूवारी सकाळी ते कल्याणमधील दुर्गाडी किल्ला चौक येथे आपल्या कार्यकर्त्यांसह हार, नारळ घेऊन आले. त्यांनी या रस्त्याने जाणाऱ्या ओला, उबर चालकांना थांबवून त्यांना हार घातला आणि नारळ दिला. या व्यवसायात आपणास पुढे यशस्वी वाटचाल करायची असेल तर सुरू असलेल्या संपात सहभागी व्हा असा संदेश या चालकांना दिला.

बहुतांशी सर्वच ओला, उबर चालकांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे संपामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. ओला, उबर, रॅपिडोचे मनमानी भाडे दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करा. बाईक टॅक्सी बंद करा. रिक्षा व कॅब परवान्यावर प्रतिबंध आणा. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ स्थापन करा. महाराष्ट्र गिग वर्कर्स कायदा लागू कर अशा प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. या संपामुळे नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या, या खासगी वाहनांवर अवलंबून असणाऱ्या नोकरदार वर्गाचे सर्वाधिक हाल होत आहेत. ओला, उबर वाहनांची रस्त्यावरील संख्या कमी झाल्याने वाहतुकीत सुटसुटीतपणा आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओला, उबर व्यवसायातील सर्वांच्या हितासाठी हा संप करण्यात येत आहे. या संपामध्ये आताच सहभागी झाला नाहीतर येणाऱ्या काळात भयंकर अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यात प्रत्येकजण होरपळून निघेल. त्यामुळे शासनाचे डोळे उघडण्यासाठी आत्ताच प्रत्येकाने या संपात सहभागी व्हावे. आता हार, नारळ देऊन सन्मान करतो नंतर कठोर भूमिका घेत स्वागत केले जाईल. शासनाने याप्रकरणात लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. नीलेश भोर ठाणे जिल्हाध्यक्ष, ठाकरे गट वाहतूक सेना.