ठाणे : येथील तीन हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वाहनाच्या धडकेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला मदत करण्याऐवजी चालकाने तेथून पळ काढला. त्याचा शोध घेण्यासाठी नौपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू केले आहे. अपघातात मृत पावलेली महिला पीटीआय वृत्त संस्थेचे प्रतिनिधी आशिष आगाशे यांच्या मातोश्री होत्या.

पुष्पश्री श्रीपाद आगाशे (७३) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या तीन हात नाका येथील मनोरुग्णालयाजवळील रोशनी कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गुरुवारी सकाळी त्या ६.४० वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. दुकानातून दूध घेतल्यानंतर त्या घरी परतत होत्या. त्यावेळी तीन हात नाका येथे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला मदत करण्याऐवजी चालकाने तेथून पळ काढला. परिसरातून जात असलेल्या नागरिकांनी त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या अपघाताची नौपाडा पोलिसांनी नोंद केली आहे. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी या वृत्तास दुजोरा देत आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा – आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

हेही वाचा – ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन तासांनंतर कुटुंबियांना समजली बातमी

पुष्पश्री आगाशे या दूध आणण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्या मोबाईल घरीच विसरल्या. बराच वेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. पण, त्यांचा शोध लागत नव्हता. अपघात झाला, त्यावेळी त्या शुद्धीत होत्या. त्यांनी मदतीसाठी आलेल्या नागरिकांना कुटुंबियांपैकी एकाचा मोबाईल क्रमांक सांगितला. पण, त्यातील एक क्रमांक चुकला आणि तो क्रमांक साताऱ्याचा निघाला. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधणे शक्य झाले नाही. दरम्यान, पुष्पश्री यांच्या इमारतीत एक परिचारिका राहते. ती जिल्हा रुग्णालयात काम करते. पुष्पश्री यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आला, त्यावेळी तिने तो पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधून माहिती दिली. त्यामुळे अपघाताच्या दोन तासांनंतर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली, अशी माहिती सुत्रांनी दिली.