कल्याण – काटई-अंबरनाथ-कर्जत मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर अंबरनाथ येथे वन विभागाच्या नाक्याजवळ हाॅटेल गोल्डन पंजाब समोर एक उंचवटा दोन्ही बाजुच्या शिरा तुटलेला गतिरोधक आहे. या गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला खड्डे पडले आहेत. या उंचवट्या गतिरोधकामुळे वाहने आपटून दररोज अपघात होत आहेत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
काटई -अंबरनाथ रस्त्यावर नवीन प्रस्तावित न्यायालय इमारतीच्या बाजुला, प्रसादम गृहप्रकल्पा समोरील भागात हा उंचवटा गतिरोधक आहे. या गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला समतल उतार नसल्याने आणि उताराचा भाग रस्त्यालगत तुटलेला आहे. या गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वेगात असलेला दुचाकी स्वार या गतिरोधकाच्या तुटलेल्या शिरा आणि खड्ड्यात जोरात आपटत आहे. मोटार चालकांना वाहनाची गती कमी करण्याऐवजी हा उंचवटा गतिरोधक ओलांडताना कसरत करावी लागते.
कर्जत, अंबरनाथ परिसरातून नवी मुंबई, ठाणे, मुंबईत जाणाऱ्या आणि तिकडून कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांना अंबरनाथ येथील वन विभागाच्या नाक्याजवळील हाॅटेल गोल्डन पंजाब हाॅटेलसमोरील गतिरोधकाचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा, रात्री सहा ते सात प्रवासी याठिकाणी दुचाकीवरून हमखास पडतात, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळेत काटई, अंबरनाथ रस्त्यावरून अवजड मालवाहू वाहने या रस्त्यावरून धाऊ लागली की या उंचवट्या गतिरोधकामुळे वाहनांचा वेग कमी होतो. त्यामुळे अवजड वाहनांच्या मागे लहान वाहनांच्या रांगा लागतात. दररोज हाॅटेल गोल्डन पंजाब भागात या अडथळ्याच्या गतिरोधकामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता मुसळधार पाऊस सुरू आहे. या गतिरोधकाच्या बाजुने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे गतिरोधकाच्या दोन्ही बाजुला पाण्याची तळी साचतात. या भागात खड्डे असतील या भीतीने वाहन चालक या रस्त्यावरून सावकाश वाहने चालवितात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत हा रस्ता येतो. या उंचवट्या गतिरोधकाविषयी अनेक तक्रारी प्रवाशांनी प्राधिकरण कार्यालयात केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे उत्तर प्रवासी देतात.
या तुटलेल्या उंचवट्या गतिरोधकाजवळ भीषण अपघात होण्यापूर्वीच हा गतिरोधक काढून टाकावा किंवा तो सुस्थितीत करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. अंबरनाथ, तळोजा, डोंबिवली औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहू वाहने येतात. त्यांनाही याठिकाणी त्रास होतो. काही उद्योजक, वाहतूकदारांनी या अडचडणीच्या गतिरोधकाविषयी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत.