गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. ठाण्यातील जांभळी नाका, स्थानक परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर या मुख्य बाजारपेठेत नागरिकांची रविवारी झुंबड उडालेली दिसून आली. कृत्रिम फुलांच्या माळा, रोषणाईच्या माळा, मखर तसेच पूजेच्या साहित्य खरेदी करण्याकडे नागरिकांचा मोठा कल असल्याचे पाहायला मिळाले. बाजारात ग्राहकांच्या झालेल्या गर्दीमुळे मासुंदा तलाव तसेच गोखले मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

हेही वाचा – ठाणे : गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ निश्चितीची सुविधा सुरु

कृत्रिम फुलांपासून तयार केलेला फुलांचा गुच्छ, झेंडू, जास्वंद, मोगरा, गुलाब, शेवंती या कृत्रिम फुलांच्या माळा, वेगवेगळया डिजाईनच्या आकर्षित माळा, रोषणाईच्या माळा, आकर्षित पडदे, पर्यावरणपूरक मखर या सारख्या अनेक गणेशोत्सवाच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे रविवारी सायंकाळी नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. करोना प्रादूर्भावामुळे गेले दोन वर्ष सर्वच सण-उत्सव साध्यापद्धतीने साजरे करावे लागले होते. यंदा करोनाचा प्रादूर्भाव ओसरला असून निर्बंधांमध्येही शिथीलता मिळाली आहे. त्यामुळे यंदा नागरिकांमध्ये गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. तर, व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – सजावट, पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरांत वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा गणेशोत्सवानिमित्त बाजारात नवनविन प्रकारच्या मखरांचा ट्रेंड आला आहे. यामध्ये पुठ्ठ्यांपासून तयार केलेले मखर, पुठ्ठा आणि लेझर लाईटचा वापर करुन तयार केलेले मखर, बांबूपासून तयार केलेल्या मखरांचा समावेश आहे. हे मखर खरेदी करण्याकडेही नागरिकांचा मोठा कल आहे. त्यासह, विविध आकर्षित असे सजावटीचे साहित्य खरेदी करुन त्यापासून गणरायाचा मखर तयार करण्याकडेही अनेकांची पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी ठाण्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी रविवारी सायंकाळी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही बाजार परिसारत वाहतूक कोंडी झाल्याचे देखील दिसून आले.