स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात जल्लोषात साजरा केला जात आहे. नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पोलीस, शासकीय, पालिका अधिकारी, विविध सामाजिक संस्था अमृत महोत्सवी उपक्रम राबविण्यासाठी झटत आहेत. हे उपक्रम सुरू असतानाच डोंबिवलीतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वरील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त लावलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर विद्यानिकेतन शाळेच्या बस विद्यार्थी घेण्यासाठी, उतरविण्यासाठी थांबल्या की पादचारी, व्यापारी या बसच्या पाठीमागे लावलेले लक्षवेधी फलक वाचण्यासाठी झुंबड करत आहेत. फलकावरील संपूर्ण मजकूर वाचल्या शिवाय बस सुरू करू नका, असे नागरिक चालकाला सांगताना दिसत आहेत.

डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण भागात विद्यार्थी वाहतुकीसाठी विद्यानिकेतन शाळेच्या बस फिरतात. अशा सुमारे २५ बसच्या मागे असे लक्षवेधी फलक लावण्यात आले आहेत.विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून हे फलक तयार करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष आचरणातून राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांमध्ये मुरली पाहिजे याकडे विवेक पंडित यांचा कटाक्ष असतो. घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मृति स्मारकाची नियमित स्वच्छता राहिल याकडे त्यांचे लक्ष असते. शहरातील पुतळ्यांची दुरावस्था झाली असेल तर त्याकडे ते प्रशासनाचे लक्ष वेधतात. महिना, दोन महिन्यातून विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी, शिक्षक या सचान स्मृति स्थळाजवळ साफसफाई करुन स्मृतीस्थळ स्वच्छ राहिल याकडे पंडित यांचे लक्ष असते. विविध राष्ट्रभक्तीचे उपक्रम विद्यानिकेतन शाळेत नियमित राबविले जातात.

कल्याण-शिळफाटा रस्त्यालगत विद्यानिकेतन शाळा आहे. शिळफाटा रस्त्यावरील खड्डे, कोंडीचा नियमित फटका या शाळेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्या परिस्थितीवर मात करत नियमित वेळेत विद्यार्थी शाळेत कसे येतील याचे नियोजन संस्थापक विवेक पंडित, संचालक अतुल पंडित यांनी केले आहे.

बसवरील संदेश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ‘सुराज्याचा पहिला वाढदिवस कधी साजरा करता येईल? असा प्रश्न फलकावर करण्यात आला आहे. नैमित्तिक राष्ट्रभक्ती, उदासीन प्रशासन, राजकीय धुळवड, भ्रष्टाचार, टोकाची धार्मिक वृत्ती, अशा अनेक समस्या आणि अडचणींमुळे आणि या प्रश्नांमुळे बेजार असलेला आपला लोकशाही देश (आहे असे म्हणणारा) ७५ वर्ष पूर्ण करत आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. पण सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार, असा प्रश्न फलकावर विचारण्यात आला आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात निस्वार्थी लोकप्रतिनिधी कधी मिळतील. जनतेच्या समस्या तत्परतेने दूर करणारे प्रशासन कधी मिळेल. जनता आपले हक्क आणि जबाबदाऱ्या ओळखून कधी वागेल, असे प्रश्न अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेने उपस्थित केले आहेत. सुराज्य हेच स्वातंत्र त्याची पहाट कधी होईल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना नागरिकांना आपल्या आजुबाजुला भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव व्हावी. त्या कधी सुटणार, कोण सोडविणार आणि आपल्या कर्तव्याची प्रत्येक नागरिकाला अमृत महोत्सवानिमित्त जाणीव व्हावी या उद्देशातून बसवरील फलकाचा उपक्रम राबविला आहे. – विवेक पंडित , संस्थापक, विद्यानिकेत शाळा,डोंबिवली