ठाणे : दोन आठवड्यापूर्वी शहापुरातील एका सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. याबाबत कोणतेही धागेदोरे नसताना केवळ खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून मोठ्या शिताफीने अटक केले. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या गुन्ह्यात गोळीबार करणारा शशांक मिश्रा उर्फ सोनू याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वी सहा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहापुरातील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात काम करणारा दिनेश चौधरी हा दुकान बंद करून बॅग घेऊन निघाला होता. त्याच सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दिनेश कडील बॅग हिसकावून नेत त्याची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता. आरोपींनी कोणताच पुरावा मागे सोडला नसल्यामुळे गुन्ह्याची उकल करणे, हे पोलिसांपुढे आव्हान होते. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी ७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण १४ पथके तयार केली होती.

हे ही वाचा… शहापूर ग्रामपंचायत अधिकाऱ्यास अटक, तीन हजारांची लाच घेताना पकडले रंगेहात

हे ही वाचा… ठाणे भाईंदर प्रकल्प लवकरच मार्गी, ‘एमएमआरडीए’च्या एकत्रित निविदेला पाच कंपन्यांचा प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्यांमार्फत आरोपी भिवंडी परिसरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्याआधारे पोलिसांनी तिथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र, तिथे त्यांना आरोपी सापडले नाहीत. परंतु आरोपींचा माग काढण्यासाठी काही धागेदोरे मिळाले. त्याआधारे शहापुरचे पोलीस उपअधीक्षक मिलींद शिंदे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पथकातील प्रकाश साहिल, मोहन भोईर, हनुमंत गायकर, स्वप्नील बोडके, शहापुर पोलिसांसह विशेष कृती पथक, गुन्हे अन्वेषण विभाग अशा १४ पोलीस पथकाने खबऱ्यांची मदत घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन शशांक मिश्रा उर्फ सोनू याला अटक केली. तर, अंकित यादव उर्फ ​​शिंटू आणि फैजान अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बॅग मिळालेली नाही, असे शहापुरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.