ठाणे : खड्डे बुजविण्याची कामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी ठाणे जिल्ह्यात खड्डय़ांमुळे प्राण गमवावे लागण्याचे प्रकार सुरूच आहेत़  भिवंडी शहरातील नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे रविवारी एकाचा मृत्यू झाला़  जिल्ह्यात दीड महिन्यात खड्डयांमुळे पाच जणांना प्राण गमवावा लागला आह़े 

अशोक काबाडी असे भिवंडीत खड्डेबळी ठरलेल्या व्यक्तीचे नाव आह़े  भिवंडी तालुक्यातील कवाड येथील आनगावामधील अशोक हे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुलगी आदिती हिच्यासोबत वंजारपट्टीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी नदीनाका पुलावर आली असता, दुचाकी चालवत असलेल्या आदितीने खड्डयामुळे दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून आलेल्या एका ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात आदिती आणि अशोक हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अशोक हे रस्त्याच्या उजव्या बाजूस पडले. त्यावेळी त्यांच्या पोट आणि छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आदिती ही रस्त्याच्या डाव्या बाजूस पडल्याने तिचा जीव वाचला. या प्रकरणी आदितीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अशोक यांच्यासह आतापर्यंत पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

खड्डय़ांमुळे अपघात होऊन नागरिकांचे प्राण जाऊ नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या़  मात्र, खड्डय़ांमुळे जीवघेण्या अपघातांचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे.

अपघात असे..

* २ जुलै : कल्याण येथील म्हारळ-वरप येथे नारायण भोईर (६५) यांचा खड्डा चुकविताना मृत्यू

* ५ जुलै : घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डा चुकविताना एसटीखाली चिरडून मोहसीन खान यांचा मृत्यू 

* १६ जुलै : कल्याण -बदलापूर मार्गावर अंकित थविया (२६) याचा खड्डयामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू 

* २३ जुलै : मुंबई- नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथे  ब्रिजेशकुमार जैस्वार यांची दुचाकी खड्डय़ात गेल्याने डम्परखाली चिरडून त्यांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* ७ ऑगस्ट : नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून ट्रकने दिलेल्या धडकेत अशोक काबाडी (६५) यांचा मृत्यू