कल्याण, डोंबिवलीतील पादचाऱ्यांना मनस्ताप; पालिकेचे मात्र कानावर हात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांच्या विरोधामुळे हटवण्यात आलेली कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरातील पदपथांवर उभारण्यात आलेली खुली व्यायामशाळा आता पुन्हा पदपथावर उभी करण्यात आली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही व्यायामशाळा हटवण्यात आली होती. मात्र, ठाकरे यांची पाठ फिरताच गेल्या काही दिवसांपासून व्यायामाचे साहित्य पुन्हा पदपथावर मांडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही व्यायामशाळा उभारणाऱ्या महापालिकेलाच पदपथावर पुन्हा अतिक्रमण करण्यात आल्याचा पत्ता नाही.

शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहरात सात ठिकाणी खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. महापौर स्वेच्छानिधी तसेच महापालिका निधीतून २१ लाख रुपये खर्चून या खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यातील तीन व्यायामशाळांचा शुभारंभ नुकताच आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीच कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या फुटपाथवर ही खुली व्यायामशाळा मांडण्यात आल्याने नागरिकांनी त्याला विरोध केला. चार रस्ता असलेल्या या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहनांची    वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस पादचाऱ्यांना सोईस्कर असलेल्या पदपथावर हे खुल्या व्यायामशाळेचे साहित्य थाटण्यात आल्याने नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न नागरिकांनी केला. यावर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने २ डिसेंबर रोजी एका रात्रीत हे साहित्य येथून बाजूच्या खुल्या मैदानात हटविले. ३ डिसेंबरला आदित्य यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुन्हा ही खुली व्यायामशाळा पदपथावर अवतरल्याने रहिवाशी चक्रावून गेले आहेत.

ही व्यायामशाळा पदपथावरच असावी यासाठी शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.  वायलेनगर परिसरात पदपथावर खुल्या व्यायामशाळेचे साहित्य नसल्याचा अजब दावा पालिका प्रशासन करत आहे. प्रत्यक्षात मात्र हे साहित्य मागील दोन दिवसांपासून व्यायामाचे साहित्य पुन्हा पदपथावर बसविण्याचे काम जोमात सुरू असून महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने सात ठिकाणी खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे. या सात ठिकाणांची आम्ही पाहणी केली असून कोठेही ती पदपथांवर नाहीत. वायलेनगर येथील व्यायामशाळाही हलविण्यात आली असून ती पदपथावर नाही.

– राजेंद्र देवळेकर, महापौर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open gym create problem for pedestrian in kalyan dombivali
First published on: 15-12-2016 at 03:07 IST