लुड्स माता चर्च, शिरलंय वाडी
वसईला चर्चची परंपरा प्रदीर्घ आहे. आकाशाला भिडणारे चर्चचे मनोरे गेल्या ५०० वर्षांपासून वसईकरांना अगदी परिचयाचे झाले आहेत. या चर्चच्या मनोऱ्यावरून येणारे घंटानाद तसे वसईकरांच्या ओळखीचे आणि त्यांची दिनचर्यादेखील त्या घंटानादावर ठरलेली. दक्षिण वसईत त्यातल्या त्यात पवित्र मरियेला समर्पित केलेली बरीच चर्चेस होती. त्यातील रमेदमाता व देवमाता या अनुक्रमे रमेदी व पाली येथील चर्चनी भाविकांची मने आपल्याकडे ओढून घेतली होती. पापडी आणि मर्सेस येथील चर्च पवित्र मरियेची थोरवी गात होती. वसईला उत्तरेच्या दिशेने मात्र देवमाता- पवित्र मरिया हिला समर्पित केलेले एकही चर्च नव्हते याची खंत गेली ४०० वर्षे तेथील भाविकांना होती. वर्षांनुवर्षे जून महिन्यात शनिवारच्या दिवशी रमेदी चर्चपर्यंत चालत भाविक मंडळी येत असत. मरियेचे एखादे तीर्थक्षेत्र जवळ असावे ही सुप्त मनीषा त्यांच्या अंत:करणातून डोकावून पाहत होती.
तसा दिवस उगवला. आगाशी येथील संत जेम्स चर्चमध्ये येणारी भाविक मंडळी कातरवाडीसारख्या दूरच्या आळीतून येत होती. जवळजवळ अर्धा-पाऊण तास तंगडतोड या भाविकांना करावी लागे. रविवारची रसोई त्यांना वेळेवर करता येत नव्हती. म्हणून आगाशीला जे नवीन चर्च होईल, ते पवित्र मरियेला समर्पित करावे, अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली.
दिवस उजाडला, आगाशी चर्चमध्ये एक आकर्षक स्वभावाचे तरुण आणि उमदे धर्मगुरू आले. त्यांचे नाव फादर ज्यो परेरा. त्यांच्यावर नवीन चर्चची जबाबदारी सोपवण्यात आली.
कातरवाडी गावाच्या बाहेर एक ४२ गुंठय़ाचा तुकडा रस्त्याला लागून होता, पण त्याच्यावर काही लागवड नव्हती. त्याच जागेला पसंती मिळाली. इकडची तिकडची माती व वाळू गोळा करून भराव करण्यात आला. ओसाड जागेला एक विशिष्ट प्रत निर्माण झाली. गेल्या शतकातील ८० च्या दशकात या जागेला नवीन रूप प्राप्त झाले.
लोकांचे बहुवर्षांचे स्वप्न साकार होत आहे हे कळताच लोकांनी देणग्यांचा जणू पाऊस पडला. २२ लाख रुपये कधी गोळा झाले हे फादर यांनाही कळले नाही. स्थानिक मंडळी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पुढे सरसावली. श्रमदान करणे म्हणजे देवाची वेगळीच प्रार्थना आहे, असे सर्वानी दाखवून दिले. श्रमदान आणि धनदान या दोन्ही बाबतीत गावातील मंडळी अग्रेसर होती. नवीन चर्चचा आशीर्वाद विधि मुंबई सर धर्मप्रांताचे आर्चबिशप कार्डिनल सायमन पिमेंटा यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी १९८७ रोजी संपन्न झाला.
घंटा मनोराविना एखादे चर्च म्हणजे नथीविना सुवासिनी. आंतोन लोपिस यांच्या पुढाकाराने चर्चघंटा गावात आली आणि येथील मनोऱ्यावर विराजमान झाली. या चर्चची वेदी फ्रान्समधील लुड्स या गावाचे प्रतिरूप दर्शविणारे आहे. लुड्स गावी माऊलीच्या पायाखालून एक झरा उत्पन्न झाला. जे भाविक त्या तीर्थक्षेत्राला भेट देतात, ते त्या झऱ्याच्या पवित्र पाण्यात आवर्जून स्नान करतात. महाराष्ट्राला सुपरिचित असलेले साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या चर्चचे प्रमुख धर्मगुरू असून फादर ज्योएल कोरिया हे येथे साहाय्यक धर्मगुरू आहेत.