अवघे चार हिमोग्लोबिन आणि आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या यशदाची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नव्हते. ‘घराबाहेर’ या नाटकातील स्त्रीला ज्याप्रमाणे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तशीच वेळ यशदावर आली होती, पण नशिबाची तिला साथ लाभली. ‘परिवर्तन’च्या परिवारात तिला सामावून घेण्यात आले. आज आपल्या बाळासह ती खुशीत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी लढा उभारला आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधातील आवाज बुलंद करणे, महिलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचे त्यांचे काम अखंड सुरूआहे. दीड दशकाच्या काळात आदिवासी भागातील महिलांसाठी त्यांनी जशा अनेक योजना राबविल्या आहेत तसेच वृद्ध लोकांसाठीही ‘परिवर्तन’ एक आधार बनला आहे.
एकीकडे महिलांना लोकशाहीत आरक्षण मिळाल्यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका तसेच विधानसभेत महिलांची संख्या वाढत आहे. महिला सबलीकरणाच्या घोषणा राजकीय पक्ष व नेत्यांकडून सातत्याने केल्या जातात. तथापि महिलांचे प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संस्थाची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी योजना राबविताना समाजातील दुष्ट शक्तींपासून स्वत:चे संरक्षण कसे करायचे शिकविण्याचे काम ‘परिवर्तन’ ही डोंबिवलीमधील संस्था अतिशय उत्तमपणे करत आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील काही महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तन’ ही संस्था सुरू केली. संस्था प्रत्यक्षात २००० मध्ये सुरू झाली असली तरी त्याची बीजे त्यापूर्वी किती तरी आधी रोवली गेली होती. डोंबिवली येथील ज्योती पाटकर संपादित ‘सखी सचिवा’ या महिलांच्या समस्यांना वाहिलेल्या दिवाळी अंकातून नऊ वर्षे महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा सातत्याने वेध घेतला जात होता. यातूनच मग सुरूझाली परिवर्तनाची पहाट. महिलांवरील बलात्काराच्या व अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन बलात्कारापासून महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर राज्यभर परिषदा घेऊन महिलांना मार्गदशन करण्याचे काम सुरुवातीच्या टप्प्यात करण्यात आले. यात महिलांना कायदेशीर लढय़ासाठी मदत करण्यापासून ते अन्यायाविरोधात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यापर्यंत गोष्टी ‘परिवर्तन’ने सुरू केल्या. युवती प्रशिक्षणसारखी योजना राबविली. विदर्भ वगळता जवळपास राज्यातील बहुतेक जिल्ह्य़ांत संस्थेने पाचशेच्या वर परिषदांचे आयोजन केले. मार्गदर्शन शिबिरे भरवली. संस्थेच्या उभारणीच्या काळात पुणे, ठाणे, नाशिक, जालना, लातूर येथील महिलांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनीच सुरू केलेल्या संस्थेचे काम ठाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे घरातून बाहेर पडलेल्या मुली व महिलांना आधार देण्याचे काम संस्थेने सुरू केले. यातूनच या महिलांना राहण्यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी निर्माण झाली. ज्योती पठाणे यांच्या पुण्यातील ‘चैतन्य महिला मंडळा’ने मोलाची कामगिरी केली. पुढे लायन्स क्लब, मुलुंड यांनी निराधार महिलांसाठी संस्थेला टिटवाळा येथे चार हजार चौरस फुटांची तीन मजल्यांची जागा अल्प भाडय़ाने देऊ केली. परिवर्तनचा मुलींचा आश्रम खरे तर हक्काचे घरकुल यातून उभे राहिले. २००५ पासून आजपर्यंत साडेतीनशे मुलींना येथे आसरा मिळाला. त्यातील बहुतेक मुली काही कारणावरून रागावून घरातून बाहेर पडल्या होत्या. अशा मुलींच्या घरी संपर्क साधून त्यांच्या घरच्यांना तसेच या मुलींना समजावून त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात येते, असे ज्योती पाटकर यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात रात्री अपरात्री भटकणारी एखादी अनोळखी मुलगी दिसली तर पोलीस अथवा स्वयंसेवी संस्था त्यांची चौकशी करून त्यांना आवर्जून टिटवाळा येथील परिवर्तनच्या संस्थेत पाठवून देतात. अठरा वर्षांच्या आतील तीस मुलींचा सांभाळ करता येईल, असा शासनाचा परवाना या संस्थेकडे आहे. सध्या येथे ४२ मुली असून त्यातील २१ मुली अठरा वर्षांच्या आतील आहेत. यातील अनेकांच्या शिक्षणापासून लग्न लावून देण्यापर्यंतची जबाबदारी संस्थेने पार पाडली आहे. प्रामुख्याने या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्यापासून ते समाजात कसे वावरावे याचे प्रशिक्षणही येथे देण्यात येते. संस्थेतील एका मुलीने अलीकडेच ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केल्याचे ज्योतीताईंनी आवर्जून सांगितले. प्रश्न केवळ संस्थेकडे येणाऱ्या मुलीपुरता मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी भागात जाऊन महिला सक्षमीकरणाचे काम संस्थेने चालवले आहे. शहापूरमधील २९ गावांमध्ये जाऊन सुरुवातीला मुलींना वह्य़ा-पुस्तके, कपडे आदी वस्तूंचे वाटप केले. त्यातून त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून शिक्षणासाठी प्रवृत्त केले. आरोग्याची माहिती देणारी अनेक शिबिरे भरवली. तरुण-तरुणींना एकत्र करून मोखाडय़ासारख्या आदिवासी भागात कायद्याचे महत्त्व विशद करणारा उपक्रम राबविला. यातून गावाला स्वयंपूर्ण करण्याचे काम हाती घेतले. पन्नास-साठ तरुणांचा गट तयार करून ग्रामसभेच्या माध्यमातून नरेगापासून वेगवेगळ्या शासकीय योजना गावासाठी कशा राबवायच्या त्यासाठी मार्गदर्शन केले. गेल्या चार वर्षांत याचा मोठा फायदा होऊन गावातील शिकलेल्या तरुणांना काम मिळू लागले. आदिवासी मुलांमध्येच नेतृत्व तयार करून त्यांच्याच माध्यमातून मोखाडय़ासारख्या ठिकाणी बियाणे विक्री, परसबाग तयार करणे आदी योजना राबवून कुपोषण रोखण्याचे कामही केले. महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करणे त्यांना शिवणकाम शिकवून रोजगार निर्मितीला मदत करणे यातून आज तीस महिला दिवसाला किमान ३०० रुपये मिळवत असल्याचे ज्योती पाटकर यांनी सांगितले. मोखाडय़ात पहिली ते चौथीच्या मुलांसाठी २० ठिकाणी खेळवाडय़ा सुरू करण्यात आल्या असून यातून सुमारे ७०० मुलांच्या सर्वागिण विकासाचे काम सुरू आहे.
किशोरवयीन मुलींच्या समस्या वेगळ्याच असतात. त्यांना पडणारे प्रश्न व प्रलोभने याचा सांगोपांग विचार करून डोंबिवली येथे शाळांमधील मुलींसाठी निमितपणे कार्यशाळा तसेच कौन्सिलिंगचे काम ‘परिवर्तन’च्या माध्यमातून केले जाते. सुमारे तीनशेहून अधिक मुलींसाठी ही योजना राबविण्यात आली असून मोखाडा तसेच शहापूर येथील मुलींचीही यासाठी मदत घेतली जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मुलींपुढील आव्हाने काय व त्यावर मात कशी करायची याचे प्रात्यक्षिकच या उपक्रमातून मिळते. या वाटचालीत वर्षां परचुरे, प्रज्ञा कुलकर्णी, सुषमा जोशी आणि सुरेखा शिंदे यांची मोलाची साथ लाभली आहे. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी दीड दशकाहून अधिक काळ काम करणाऱ्या या संस्थेला शासनाकडून फुटकी कवडीही मिळत नाही ही दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. अर्थात समाजातील दानशूर लोकांकडून मोठय़ा प्रमाणात मदत मिळत असल्यामुळे संस्थेचा कारभार चांगला चालला आहे. जवळपास पन्नास लाखांहून अधिक खर्च वर्षांकाठी हे वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी येत असतो. त्यातच वृद्ध लोकांसाठी डोंबिवलीमधील एमआयडीसी येथे एका आश्रमाची निर्मिती करण्यात आली असून १७ वृद्धांच्या राहण्याची सोयही केली आहे. ठाणे जिल्ह्य़ाशिवाय लातूर व पुणे येथेही एकल महिलांसाठी संस्थेचा काम सुरूअसून महिला सक्षमीकरणासाठी झपाटल्यासारखे काम वयाच्या ६६ व्या वर्षी करणाऱ्या ज्योती पाटकर यांचा उत्साह दांडगा म्हणावा लागेल. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी सढळ मदत केल्यास तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणाचे काम अधिक ताकदीने होऊ शकेल.
ज्योती पाटकर- ९३२२२१७०२४.
