ठाणे: शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने धोकादायक वृक्षफांद्यांची छाटणी मोहीम सुरू केली असतानाही, शहरात रविवारी एका ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटारवर वृक्षाची फांदी पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. मोटारवर पडलेल्या वृक्षाची फांदी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी कापून बाजूला केले.

दरवर्षी शहरात पावसाळ्यात वारंवार वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे जिवितहानी तसेच वित्तहानीचे प्रकार घडत असतात. असे प्रकार यंदाच्या पावसाळ्यात होऊ नयेत. यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटणीची कामे शहरातील विविध ठिकाणी सुरू केली आहेत. यामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस थांबे आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे.

यंदा नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याची सुरूवात झाली आहे. आतापर्यंत २७५३ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या मोहिम सध्या सर्वत्र सुरू असताना देखील शहरात एका ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, ४ मे रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिवाई नगर येथील पोखरण रोड नंबर – १ या भागातील ट्युलिप इमारती समोर घडली.

या परिसरातील रस्त्यावर उभ्या केलेल्या एका मोटारवर या वृक्षाची फांदी पडल्याने तिचे नुकसान झाले. या घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेत, पडलेली फांदी कापून एका बाजूला केले. अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली. विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे शहरात दोन वृक्ष उन्मळून पडले होते. या घटनेत एका मोटारचे नुकसान झाले होते. तर दुसऱ्या घटनेत पडलेले वृक्ष कापून बाजुला करताना ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे एक कर्मचारी हे जखमी झाले होते.