पास्कल लोपीस यांच्याकडे २ हजार जुनी नाणी, ४०० विविध छापे, टपाल तिकिटे, पाकीटे यांचा संग्रह

धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत छंद जोपासणारे अनेक जण आहेत पण एका छंदासाठी स्वत:ला वाहुन घेणारे काहीच असतात. इतिहासाच्या अभ्यासाबरोबर जवळपास २हजार जुनी नाणी, ४०० विविध छापे, टपाल तिकिटे, पाकीटे यांचा संग्रह असणारे पास्कल लोपीस असेच एक अवलिया.

पास्कल यांनी मुंबई विद्यापीठातून निमिस्मॅटिक आणि पुरातत्व शास्त्रात पदवी घेतली आहे. ते भारतीय, पोर्तुगीज व मराठा नाण्यांवर संशोधन करत आहेत. सध्या त्यांच्याकडे २हजार च्या वर नाण्यांचा संग्रह आहे. यामध्ये मौर्य, मुघल, पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे. सोने, चांदी, तांबे, लेड, ब्रॉन्झची नाणी आपल्याला लोपीस यांच्याकडे पाहावयास मिळतात. महर्षी कर्वे, डॉक्टर विश्वेशर राय, मदर तेरेसा व सचिन तेंडुलकर आदी मान्यवरांचे छायचित्र असलेली पोस्टाची तिकीटे त्यांच्या संग्रहात आहेत. पास्कल यांना लहानपणापासून नाणी जमवण्याचा छंद होता. एका मित्राकडुन किंग जॉर्ज यांच्या नावाचे नाणे खाऊच्या पैशातून त्यांनी विकत घेतले होते तेव्हापासुन त्यांच्या नाणे जमण्याच्या छंदाला सुरुवात झाली. नाण्यांवर अनेक लेख त्यांच्या वाचनात आले. त्यातून नाण्यांबाबतची उत्सुकता अधिकच वाढली. त्यांनी लिलावाहतही अनेक नाणी विकत घेतली आहेत. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ पाडल्या गेलेल्या सर्व भारतीय नाणी व नोटा, गांधींच्या स्मरणार्थ पाडलेले चांदीचे पहिले दहा रुपयाचे नाणे, शंभर रुपये, पन्नास रुपये, दहा रुपये, पाच रुपये, १ रुपया, पन्नास पैसे, वीस पैसे, अशी नाणी देखील त्यांच्या संग्रही आहेत.