मध्य रेल्वेने गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूर, टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान नव्याने सुरू केलेल्या १० लोकल काही प्रवाशांच्या विरोधामुळे, राजकीय हस्तक्षेपामुळे रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. काही प्रवाशांचा वेगळा विचार मध्य रेल्वे आणि राजकीय मंडळींनी करावा. ज्यांना वातानुकूलित लोकलने प्रवास करायचा आहे. त्यांच्यासाठी मध्य रेल्वेने सकाळी ७.३० ते सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान दोन ते तीन वातानुकूलित लोकल सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

ठरावीक रेल्वे स्थानका वरील प्रवाशांचा विरोध आणि त्यांची गैरसोय होते म्हणून सरसकट वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्याने बदलापूर, टिटवाळा ते ठाणे आणि पुढे वातानुकूलित लोकलचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांवर अन्याय झाला आहे, अशा प्रतिक्रिया कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांकडून देण्यात येत आहेत.वातानुकूलित लोकलला सर्वाधिक प्रतिसाद कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांमधून मिळत आहे. त्यामुळे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांचा विचार वातानुकूलित लोकल रद्द करताना करण्यात आलेला नाही. हा या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय आहे. राजकीय मंडळी त्यांच्या मतांच्या हिताने या विषयात उतरतात आणि गोंधळ घालून ठेवतात, अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिल्या.मुंबई परिसरातील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली,कल्याण भागातील बहुतांशी नोकरदार सकाळी साडे सात ते साडे आठ दरम्यान प्रवास करतो. या प्रवाशांमध्ये कार्पोरेट, व्यावसायिक, उच्चपदस्थ सरकारी नोकरदार यांचाही समावेश आहे. हा सर्व वर्ग वातानुकूलित लोकल मधून प्रवास करण्यास इच्छुक आहे. या माध्यमातून रेल्वेला महसूल मिळत आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन : प्राण्यांसाठी निवाऱ्याच्या संकल्पाला अर्थबळ हवे ;

कल्याण ते ठाणे परिसरातील वातानुकूलित लोकलने प्रवास करणारा बहुतांशी नोकरदार हा उच्चपदस्थ, काॅर्पोरेट असल्याने तो वातानुकूलित लोकल रद्द केल्या म्हणून आंदोलन, लोकल अडविणे असे प्रकार करणार नाही. अशा प्रवाशांची मोठी घुसमट आता होत आहे. याचा विचार रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने करावा, अशी या प्रवाशांची मागणी आहे.डोंबिवली स्थानकातून याआधी ७.४० ची सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकल होती. ही लोकल रद्द करुन ती ८.५९ ची कल्याण लोकल करण्यात आली. या प्रवाशांचा भार आता नियमित लोकलवर येत आहे. वाढते तापमान, घामाच्या धारा याचा विचार करुन अलीकडे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. सरकारी, विविध खासगी आस्थापनांमधून सेवानिवृत्त झालेले अनेक उच्चपदस्थ अधिकारी निवृत्ती नंतर मुंबई, ठाणे इतर शहरांमध्ये खासगी आस्थापनांमध्ये सेवा देतात. त्यांची या लोकलला सर्वाधिक पसंती असते. आता वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्याने त्यांचीही कुचंबणा झाली आहे. बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वातानुकूलित लोकलला पसंती आहे. मुंबईत जाण्यासाठी लोकल नसल्याने ते नियमित लोकलने प्रवास करत आहेत.

वाढत्या गर्दी मुळे यापूर्वी नियमित लोकलच्या प्रथम श्रेणी दर्जा डब्यातून मुंबईत प्रवास करत होतो. वातानुकूलित लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलने समाधानकारक प्रवास करत होतो. आता या लोकल वेळेत डोंबिवली स्थानकात येत नसल्याने पुन्हा प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास सुरू केला आहे. – कृष्णा पालये , प्रवासी, डोंबिवली

प्रत्येकाला मुंबईतील आपली कार्यालयीन वेळ गाठायची आहे. हा विचार करुन रेल्वेने नियमित आणि वातानुकुलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करुन सकाळच्या वेळेत नियोजन करुन वातानुकूलित आणि नियमित लोकल सोडाव्यात. यामुळे कोणाची गैरसोय होणार नाही. – चैत्राली महाडिक ,प्रवासी, कल्याण

मुंबईत मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी जातो. डोंबिवली स्थानकातून यापूर्वी सकाळची वातानुकूलित लोकलने मुंबईत महाविद्यालयीन वेळेत जाणे शक्य होते. ती लोकल नंतर कल्याण करण्यात आली. आता नियमित लोकलने मुंबईत जातो. – आकाश बोऱ्हाडे , विद्यार्थी