डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्कायॅवाॅकच्या जिन्याची एक मार्गिका उर्सेकरवाडीतील भाजी मंडईजवळ उतरते. या जिन्याच्या पायऱ्या आणि त्यावरील लोखंडी पट्ट्या गुळगुळीत आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. या लोखंडी पट्ट्यांमध्ये प्रवाशांचे पाय, चपला अडकून प्रवासी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने या जिन्याची डागडुजी करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर किंवा रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अनेक प्रवासी, नागरिक उर्सेकरवाडीतील भाजी मंडईजवळील जिन्याचा वापर करतात. या जिन्याच्या पायऱ्यांना आधार म्हणून लावलेल्या लोखंडी पट्ट्या सिमेंट काँक्रीट निघून गेल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. काही लोखंडी पट्ट्या प्रवासी जिन्यावरून जात असताना पायाचा दाब पडल्यावर हलतात. प्रवासी या जिन्यावरून उतरत असेल आणि त्याचे लक्ष पायऱ्यांकडे नसेल तर अनेक वेळा प्रवाशाचा पाय, चप्पल लोखंडी पट्टीत अडकतो. प्रवासी तोल जाऊन खालच्या दिशेने पडतो.

हेही वाचा – रेल्वे अपघातात मरण पावलेल्या कल्याणच्या प्राजक्ता गुप्तेना रेल्वेकडून आठ लाखाची भरपाई

सकाळी गर्दीच्या वेळेत प्रवासी जिन्यावरून उतरत असतात. त्यावेळी असे प्रकार अधिक प्रमाणात होतात, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक ज्येष्ठ, वृद्ध या जिन्यांवरून येजा करतात. त्यांना काळजीपूर्वक या जिन्यावरून उतरावे लागते.

भाजीपाला विक्रेत्यांची, खरेदीदारांची याठिकाणी वर्दळ असते. या जिन्याजवळ रुग्णालय आहे. रुग्ण, नातेवाईक या जिन्यावरून जातात. प्रवाशांची या जिन्यावरील वाढती वर्दळ विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने या जिन्यासह इतर जिन्यांच्या उतार मार्गाची डागडुजी करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्कायवाॅकच्या जिन्यांची दुरवस्था झाली असेल तर त्यांची पाहणी करून आवश्यक ती डागडुजी केली जाईल. तातडीने हे काम हाती घेण्यात येईल. – मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.