कल्याण – कल्याण डोंंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णवाहिका काही वेळा बंदच तर कधी चालक नसतो. अशा परिस्थितीत रूग्ण नातेवाईक रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या माध्यमातून रुग्णाला अन्य रुग्णालयात, रुग्ण मयत असेल तर आपल्या गावी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी खासगी रुग्णवाहिका चालक रूग्ण नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी करतात, अशा रुग्ण नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका चालकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. वेळ आली की रुग्णाच्या नातेवाईकांची अडवणूक करून त्यांच्याकडून वाट्टेल तसे भाडे हे खासगी रुग्णवाहिका चालक आकारात असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी या खासगी रुग्णवाहिका चालकांचे रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकांबरोबर हातमिळवणीचे संबंध होते. त्यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिका कधी बंद, कधी रुग्णवाहिकेचा सुटा भाग तुटलेला, कधी रुग्णवाहिका अपघाग्रस्त करून गुपचूप रुग्णालय आवारात आणून उभी केलेली, अशी परिस्थिती असायची.
रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णाला ठाणे, मुंबईत उपचारासाठी स्थलांतरित करायचे असेल तर यापूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयाची रुग्णवाहिका वेळेवर कधीच मिळायची नाही. या रुग्णवाहिकांचे पालिकेचे वाहन चालक (निलंबित) यांची मनमानी होती. डाॅक्टर, परिचारिका त्यांना रुग्ण हलविण्यासाठी आग्रह करायच्या नाहीत. पालिकेच्या या रुग्णवाहिका चालकांच्या अडेल भूमिकेमुळे रुग्ण नातेवाईक रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेरील खासगी रुग्णवाहिका चालकांच्या माध्यमातून रुग्णाला अन्य भागात, मयताला गावी नेण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी रुग्ण नातेवाईक अडलेला असल्याने त्याच्याकडून दामदुप्पट भाडे हे खासगी रुग्णवाहिका चालक वसूल करत होते. आताही तीच परिस्थिती आहे, असे तक्रारदार सांगतात.
दोन दिवसापूर्वी कल्याण परिसरात एका इमारतीवरून पडून करिया बिच्चप्पा या मजुराचा मृत्यू झाला. या मजुराचे रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी त्याला तेलंगणातील गावी नेण्याचा निर्णय घेतला. यावेळी रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेरील एका खासगी रुग्णवाहिका चालकाने या प्रवासासाठी या कष्टकरी कुटुंबीयांना २५ हजार रूपये भाडे देण्याची मागणी केली.
कष्टकरी वर्गातील या कुटुंबाने मयताच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहून भाडे घ्या अशी मागणी केली. रुग्णवाहिका चालक २५ हजार रुपये घेण्यावर ठाम होता. एवढे पैसे नसल्याने कष्टकरी शोकाकुल कुटुंब चिंताग्रस्त होते. एका खासगी रुग्णवाहिका चालकाने मृताच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती पाहून १५ हजार रूपयांमध्ये तेलंगणा येथे मयताला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कमी भाडे घेतल्याने पहिल्या रुग्णवाहिका चालकाने त्यास हरकत घेतली. खासगी रुग्णवाहिका चालकांमधील वादामुळे मृतदेह तीन तास शवागारात होता. इतर रुग्णवाहिका चालकांनी मध्यस्थी केल्यानंतर पंधरा हजार रूपये भाड्यात मृतदेह तेलंगणाला नेण्यात आला. एका गरीब कुटुंबाजवळ पुरेसे पैसे नसल्याने याच रुग्णवाहिका चालकांनी रुग्णाला कळवा येथे नेण्यास विरोध केला होता. या दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.
पालिकेच्या रुग्णवाहिका, शववाहिका सुस्थितीत असेल तर रुग्ण नातेवाईकांना बाहेर फिरण्याची वेळ येणार नाही. पालिकेचा दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प असताना पालिकेच्या रुग्णवाहिका सुस्थितीत नसतात. त्या सुस्थितीत ठेवण्याची मागणी रुग्ण नातेवाईक करत आहेत.