डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव हरितपट्ट्यात विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकामे याविषयीची इत्थंभूत माहिती नगररचना विभागाच्या भूमापकाने पालिकेच्या ग प्रभाग अधिकाऱ्यांना गेल्या दीड महिन्यांपूर्वी करून दिली आहे. दीड महिना झाला तरी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे आयरे भागातील १४ बेकायदा इमारती, हरितपट्ट्यातील बेकायदा चाळी तोडण्यास टाळाटाळ करत असल्याने या भागातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘बेकायदा बांधकामधारकांना आपण नोटिसा पाठविल्या आहेत. पोलीस बंदोबस्त मागविला आहे. तो मिळाला की कारवाई करू,’ अशी ठोकळेबाज उत्तरे साबळे यांच्याकडून देण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी, आयरे गावातील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयरे गावात १४ बेकायदा इमारती खारफुटी तोडून सरकारी, खासगी जमिनीवर पालिकेच्या परवानग्या न घेता उभारल्या आहेत. शेकडो एकरचा खारफुटीचा पट्टा या बेकायदा बांधकामांसाठी तोडण्यात आला आहे. बेकायदा बांधकामे उभ्या राहिलेल्या जमिनीचे आरेखन भूमाफक संजय पोखरकर यांनी गेल्या महिन्यात साबळे यांना करून दिले. आता कारवाई करण्याचे काम साबळे यांचे आहे. ते कारवाईच करत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याने आयरे गाव ग प्रभाग हद्दीत ३२ नवीन बेकायदा बांधकामांची उभारणी करण्याचे नियोजन भूमाफियांनी केले आहे, अशी माहिती आयरे गावचे जागरुक रहिवासी तानाजी केणे यांनी दिली.

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द; श्री साधकांचे उष्माघाताने निधन झाल्यामुळे कार्यक्रमाच्या निमंत्रकांचा निर्णय

आयरे हद्दीतील वर्षानुवर्ष पडिक असलेले २०० ते ३०० मीटरच्या भूखंडावर इमारती बांधण्यासाठी माफिया सज्ज झाले आहेत. या भूखंडांवर कोणी हक्क दाखवू नये म्हणून माफियांनी या भूखंडांना चारही बाजूने पत्रे ठोकली आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. आयरे गावातील गावकीच्या गावदेवी मंदिराच्या जागेवर ग प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादने बेकायदा बांधकाम उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

ग प्रभागात थंडावा

कल्याण पूर्वेत आय प्रभागात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, टिटवाळा अ प्रभागात साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, ह प्रभागात साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते पालिकेतील पोलीस बंदोबस्त घेऊन बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करत आहेत. मग ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त साबळे हेच पोलीस बंदोबस्ताची मागणी का धरून बसले आहेत. पालिकेतील पोलीस बंदोबस्त घेऊन ते बेकायदा बांधकामे का तोडत नाहीत, असे प्रश्न आयरेतील रहिवाशांनी केले.

आयरेतील बेकायदा बांधकामांमध्ये काही पालिका, पोलिसांची भागादारी असल्याने या भूमाफियांच्या दबावामुळे ग प्रभागाकडून आयरेतील बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. साहाय्यक आयुक्त साबळे यांची बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता नाही. आय प्रभागात असतानाही ते बेकायदा बांधकामांची पाठाराखण करणे अशाच भूमिकेत वावरत होते. आता ग प्रभागातही ते तीच भूमिका वठवित आहेत. आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांना तातडीने प्रभाग कार्यालयातून उचलबांगडी करून कारकुनी कामासाठी नियुक्त केले पाहिजे, असे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांचा मातीच्या ढिगावरून प्रवास; एक महिन्यापासून मातीचा ढीग रस्त्यावरच

साबळे यांच्याकडून आयरेतील बेकायदा बांधकामांची पाठराखण केली जात असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी एक जागरुक नागरिक आणि आयरे गावातील नागरिकांकडून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली जाणार आहे.

‘बेकायदा बांधकामे ते का तोडत नाहीत, हे साबळे यांना विचारा. पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांनी बांधकामे तोडली पाहिजेत. त्यांना यासंदर्भात कळविण्यात येईल,’ असे परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात पर्यावरण प्रेमींकडून राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे.

“बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी प्रत्येक वेळी पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त घेण्याची गरज नाही. पालिकेतील पोलीस घेऊन आयरे गावातील बेकायदा बांधकामे साहाय्यक साबळे पाडू शकतात. यासंबंधी त्यांना बांधकामांवरील कारवाईसाठी आदेशित करतो.” असे अतिक्रमण विभाग, उपायुक्त, सुधाकर जगताप म्हणाले.