लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कल्याणफाटा येथील एमआयडीसी पाईपलाईन (जलवाहिनी) मार्गावर येत्या काही दिवसांत जलवाहिनी बदलण्याचे तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निर्माणाचे कामे केली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील कोंडीचा अभ्यास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी तीन दिवसीय प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. या बदलामुळे शिळफाटा, महापे मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पांमुळे वाहतुक बदल

कल्याण, बदलापूर भागातून हजारो वाहन चालक नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करण्यासाठी एमआयडीसी मार्गाचा वापर करतात. एमआयडीसी जलवाहिनी मार्गाच्या दोन्ही बाजूस जलवाहिनी आहेत. या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्याठिकाणी नव्या जलवाहिनी टाकण्याची कामे एमआयडीसीकडून हाती घेतले जाणार आहे. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगद्याचे खोदकाम, खांबाची उभारणी अशी कामे केली जाणार आहे. यातील जलवाहिनी टाकण्याच्या कामास किमान तीन महिने तर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांसाठी २० ते २५ दिवस लागणार आहेत.

आणखी वाचा-डोंबिवली कल्याणमध्ये अवकाळी पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल

या कामांमुळे मोठ्याप्रमाणात कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी येथे २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले आहेत. दररोज सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुक बदल लागू राहतील. या तीन दिवसांच्या कालावधीत कल्याणफाटा ते पुजा पंजाब उपाहारगृह पर्यंत एकेरी मार्गिका सुरू राहील. त्यामुळे शिळफाटा-महापे मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे.