ठाणे : आपत्तीच्या काळात नागरिकांची गैरसोय झाली आहे. आम्हाला प्रथम नागरिकांना मदत करायची आहे. कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायचे नाही. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे. मागील २५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहित आहे. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी सांयकाळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आपत्तीच्या काळात नागरिकांची गैरसोय झाली आहे. आम्हाला प्रथम नागरिकांना मदत करायची आहे. कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायचे नाही. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे. मागील २५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहित आहे. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही असे शिंदे म्हणाले. आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पावसामुळे झालेल्या परिस्थितीविषयी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांनी आदित्य यांना प्रत्युत्तर दिले.
ठाण्यात १३२ मीमी पाऊस पडला असतानाही ठाण्यात कुठेही पाणी साचले नाही. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे. त्याठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा करण्यात आला. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे संपर्क आणि समन्वयाच्या माध्यमातून महापालिका कार्य करत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. एखाद्या व्यक्तीची तक्रार आल्यास ती तक्रार सोडविण्यासाठी पथके तात्काळ त्या ठिकाणी जातात. अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूरवर आपत्ती येणार नाही. यासाठी सरकार काळजी घेणार आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.