कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता राजकीय मंडळींचा आशीर्वाद असलेल्या भाई मंडळींनी पालिकेच्या परवानग्या न घेता बिनधास्तपणे डोंबिवली, कल्याण मधील रस्ते अडवून फटाक्यांची दुकाने लावली आहेत. नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते मंडळींनी रस्त्यांच्या दुतर्फा भव्य कमानी उभ्या केल्या आहेत. फटाक्यांचे मंच, कमानींमुळे डोंबिवली, कल्याण मधील रेल्वे स्थानक, सर्वाधिक वर्दळीचे रस्ते गेल्या चार-पाच दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत अडकत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर फटाक्यांची दुकाने लावण्यास आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मनाई केली आहे. पालिकेने निश्चित केलेल्या पालिका मैदानांवर विक्रेत्यांनी परवानगी घेऊन दुकाने लावावीत असे पालिकेचे विक्रेत्यांना आवाहन आहे. तरीही अनेक फटाके विक्रेते पालिकेच्या आवाहनाला न जुमानता सर्वाधिक वर्दळीच्या डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर मंच टाकून फटाके विक्रीची दुकाने सुरू करत असल्याने प्रभाग साहाय्यक आयुक्तांची कोंडी झाली आहे.

हेही वाचा : समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

या कोंडीचा सर्वाधिक फटका संध्याकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या नागरिकांना बसत आहे. तुटपुंजे वाहतूक पोलीस आणि जागोजागी वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदी करत असल्याने ही वाहनेही वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. डोंबिवली पूर्व भागात दररोज कोंडी होत आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून मुख्य रस्त्यावर लागण्यासाठी अलीकडे अर्धा तास लागतो.

राजकीय कमानी, फटाके

राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने त्यांच्या पंटरने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात पालिका साहाय्यक आयुक्तांना न जुमानता, पालिकेच्या फटाके विक्रीच्या परवानग्या न घेता रस्त्यावर मंच उभारुन फटाके विक्रीला सुरूवात केली आहे. भाई मंडळींचे हे कार्यकर्ते फटाके विक्री करत असल्याने साहाय्यक आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली तर थेट नेते मंडळी संपर्क करुन साहाय्यक आयुक्तांची झाडाझडती घेत आहेत. आयुक्त डाॅ. दांगडे यांनी रस्त्यावर एकही फटाके दुकान, फेरीवाला दिसता कामा नये असे आदेश दिले आहेत. त्याचवेळी राजकीय मंडळींचे भाई कार्यकर्ते आम्हाला हात लावयाचा नाही. फटाके विक्री दुकानांवर कारवाई करायची नाही अशी दमदाटी अतिक्रमण नियंत्रण कर्मचाऱ्यांना करत असल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा,मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवापासून आणि आता दिवाळीच्या सणाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा देणाऱ्या कमानी कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात गेल्या दोन महिन्यांपासून लावण्यात आल्या आहेत. या कमानी गेल्या दोन महिन्यापासून काढण्यात आल्या नाहीत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ इंदिरा चौकात नवरात्रोत्सव काळात मुख्यमंत्री शिंदे, खा. शिंदे यांची शुभेच्छा देणारी कमान आतापर्यंत कायम आहे. पालिकेकडे शुल्क भरणा करुन गणेशोत्सव काळापासून कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्ते, चौक, कमानी लावण्यासाठी अडवून ठेवायचे. गणेशोत्सव संपला की तेथे नवरात्रोत्सव मग दिवाळी सणाच्या शुभेच्छा देणारे फक्त संदेश चिकटावायचे. हे करत असताना इतर पक्षांना फलक लावण्यासाठी कोठे जागा मिळू नये अशीही व्यवस्था यानिमित्ताने केली जात आहे, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली.

डोंबिवली, कल्याण ग्रामीण मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे आ. प्रमोद पाटील यांचे फलक लागलेले असतात. हे फलक सण संपला की काढले जातात. परंतु, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवरील त्यांचे आणि पुत्राचे फलक काढले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पालिका साहाय्यक आयुक्त प्रभाग हद्दीतील सर्व फलक, कमानी काढण्यास लावतात मग दोन महिन्यांपासून रस्त्यांवरील कमानींना पाठीशी का घातले जाते, असे प्रश्न नागरिक करत आहेत. अशीच परिस्थिती कल्याण रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर दिसून येत आहे.

वालधुनीच्या कोंडीत आयुक्त

शहरातील फेरीवाले हटविले जातात की नाही, रस्ते डांबरीकरण कामे सुरू आहेत की नाही हे पाहण्यासाठी आयुक्त डाॅ. दागंडे सध्या रात्रीच्या वेळेत शहराच्या विविध भागात फेरफटका मारत आहेत. कल्याण मधील वालधुनी भागात वाहन कोंडी असल्याने या कोंडीत मंगळवारी रात्री आयुक्त दांगडेंचे वाहन अडकले होते, असे डोंबिवलीतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of kalyan dombivli are facing traffic jams due to street banners tmb 01
First published on: 19-10-2022 at 12:58 IST