ठाणे: ठाण्यातील ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून यंदाही ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, फॅशन शो आणि ट्विन वाॅक असे आगळे-वेगळे कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच ठाणेकरांना श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध दुर्मिळ प्रजाती पहाव्यास मिळणार आहेत. याशिवाय, याठिकाणी विविध खाद्यपर्थांचे व पेय स्टाॅल लावण्यात येणार असल्याने नागरिकांना खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.

पाळीव प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्यावतीने यंदाही ‘पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागातील डिमार्टलगत असलेल्या गार्डन इस्टेटजवळील मैदानात २५ ते २६ फेब्रुवारी रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यातील विजेत्यांसाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी विविध खाद्यपर्थांचे व पेय स्टाॅल लावण्यात येणार असल्याने नागरिकांना खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे जय निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

पाळीव प्राण्यांची विनामुल्य आरोग्य तपासणी, श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, श्वानांची चपळता, चालाखी आणि आज्ञाधारकता यावर आधारित कार्यक्रम, फॅशन वाॅक, एक्झाॅटिक ब्रीड शो, खेवरा सर्कल ते कार्यक्रम स्थळापर्यंत पेट रन, ट्विन वाॅक, ब्रीड फेस्टीवल, असे कार्यक्रम दोन दिवसीय फेस्टीवलमध्ये होणार आहेत. विविध तज्ज्ञांमार्फत श्वानांविषयी माहिती दिली जाणार आहे. श्वानांचा वयोवृद्ध, गतीमंद आणि रुग्णांकरीता होणारा थेरोपी वापर, प्रशिक्षित श्वानांचे संचलन, सैन्य दलातील श्वान प्रशिक्षकांची उपस्थिती, ३६० अंशामध्ये छायाचित्रीकरण कार्यक्रम होतील. याशिवाय, श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध प्रजातीही ठाणेकरांना पहाव्यास मिळणार आहेत, माहिती जय निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचा >>> कल्याणमधील बिबट्या हल्ल्यातील जखमीला वन विभागाचे अर्थसाहाय्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरात विविध फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. त्यात गेल्या चार वर्षांपासून शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’ची भर पडली आहे. या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुमारे २०० पाळीव श्वानांची परेड काढली होती. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कलपर्यंत काढण्यात आलेल्या परेडमध्ये श्वानांचे मालक राष्ट्रध्वज हाती घेऊन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले होते.