पेट्रोल पंपांच्या यंत्रामध्ये फेरफार करून ग्राहकांची लूट केल्याप्रकरणी आणखी पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या तीन दिवसांत अटक केली आहे. त्यामध्ये तीन पेट्रोल पंप मालक तर उर्वरित दोघे पेट्रोल मशीन तंत्रज्ञ आहेत. राज्यातील धाडीनंतर पोलिसांनी पेट्रोल यंत्र बनविणाऱ्या कंपन्यांच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविलेल्या विविध पंपावरील साहित्यांमध्ये फेरफार झाल्याची बाब अहवालातून पुढे आली असून या अहवालाच्या आधारेच पोलिसांनी या तीन पंप मालकांवर अटकेची कारवाई केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून इंधन चोरीच्या संशयावरून राज्यभरातील १७८ पेट्रोल पंपांवर धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडींमध्ये पंपांवर होत असलेली इंधन चोरी उघड करत पोलिसांनी आतापर्यंत २४ आरोपींना अटक केली होती. या चोरीप्रकरणामध्ये विनोद अहिरे आणि डंबरुधर लालमल मोहंतो हे दोघे फरार होते. त्यामुळे पोलिसांची पथके दोघांच्या मागावर असताना त्यांनी विनोदला कल्याणमधून तर डंबरुधरला ओरीसातून नुकतीच अटक केली.

दरम्यान, राज्यातील पेट्रोल पंपांवर धाडी टाकल्यानंतर पोलिसांनी पेट्रोल यंत्रामधील पल्सर, कि पॅड, मदर बोर्ड, कंट्रोल कार्ड असे साहित्य जप्त केले होते. रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोल पंप, कल्याणमधील साई काटई पेट्रोल पंप आणि सदगुरू पेट्रोल पंप या तीन पंपांचे अहवाल प्रयोगशाळेकडून पोलिसांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.

या अहवालामध्ये पंपावरील साहित्यांमध्ये फेरफार झाल्याची बाब उघड झाली आहे. या अहवालाच्या आधारे पोलिसांनी जयदास सुकूर तरे, संजयकुमार सरजू प्रसाद यादव, बाळाराम गायकवाड अशा तिघा पेट्रोल पंप मालकांना अटक केली आहे.

पेट्रोल पंप पुन्हा रडारवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल पंपावरील इंधन चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनोद आणि डंबरुधर या दोघांकडून ठाणे पोलिसांनी राज्यातील आणखी काही पंपांची माहिती मिळाली आहे. नागपूर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील हे पंप असून या पंपांवर ठाणे पोलिसांकडून दोन दिवसांत धाडसत्र सुरू होणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.