डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा विभागाचे कर्मचारी मागील पाच ते सहा दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी फिरकत नसल्याने डोंबिवली पूर्वतील एमआयडीसी, मानपाडा रस्त्यावरील अनेक गृहसंकुलांच्या आवारात कचरा संकलन कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत आहेत. कचरा कोठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाल्याने सोसायटीतील कचरा उचलणारा कचरा संकलक कामगार घरातील कचरा उचलण्यासाठी येत नाही. त्यामुळे घरातही ओला, सुका कचरा पडून आहे, अशा तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत आहेत.

आमच्या भागातील, सोसायटीतील कचरा का उचलला जात नाही. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून कचरा वाहून बंद आहेत. ती दुरुस्तीसाठी गेली आहेत. गणपतीमुळे कामगार रजेवर आहेत, अशी उत्तरे देत पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत असे तक्रारदार रहिवाशांनी सांंगितले. सोसायटी आवारात ओल्या बरोबर सुका कचराही पडून आहे. ओला कचरा पावसामुळे भिजून खराब होत आहे. त्याला दुर्गंधी सुटत आहे.

एमआयडीसीतील आडबाजुचे रस्ते, काही मुख्य रस्त्यांवर, डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागातील रेल्वे मैदान परिसरात कचरावाहू वाहने कचरा उचलण्यासाठी येत नाहीत म्हणून रहिवाशांनी रात्रीच्या वेळेत कचरा आपल्या घर परिसरातील मोकळ्या जागा, कचराकुंडीच्या जागांच्या ठिकाणी, रेल्वे मैदान भागातील झाडाझुडपांच्या बुडाशी टाकला आहे. या कचऱ्यावर भटकी कुत्री झुंडीने येऊन कचरा विस्कटुन टाकतात. त्यामुळे ढिगाने असलेला कचरा परिसरात पसरतो.

गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या विविध भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिक, माजी नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने काही प्रभागांचा कचरा उचलण्याचा ठेका एका खासगी कंपनीला दिला आहे. या कंंपनीच्या कचरा उचलण्याच्या कामाविषयी ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांंनी अनेक वेळा पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या ठेकेदार कंपनीचे काम योग्यरितीने होत नाही. त्यामुळे त्यांचा ठेका रद्द करण्याची मागणी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे सातत्याने पालिकेकडे करत आहेत.

खासगी ठेकेदार कंपनी, पालिकेचे सुमारे दोन हजार कामगार एकावेळी शहरात कार्यरत असताना कचऱ्याची समस्या शहरात निर्माण होतेच कशी. या कामावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असे प्रश्न जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. गणेशोत्सवामुळे अनेक कामगार रजेवर आहेत. त्यामुळे कचरा वाहून चालविण्यासाठी पुरेसे चालक, कामगार नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याची पालिकेत चर्चा आहे.

आमच्या संघवी गृहसंकुलात एकूण ११ सोसायट्या आहेत. मागील सात दिवसांपासून सोसायटी आवारातील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे सोसायटीत कचऱ्याच्या डब्यांमध्ये ढीग तयार झालेत. पालिकेला संपर्क केल्यावर विविध कारणे दिली जात आहेत.- धनराज ओझा रहिवासी.

सोसायटी आवारात ओला, सुका कचरा जमा करून ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. घरांमधुन जमा केलेला कचरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने कचरा वेचक घराघरात कचरा संकलित करण्यासाठी येणे बंद झाले आहे. त्यामुळे घरातही कचऱ्याचे ढीग लागले आहेत. – राधिका राव रहिवासी.

गणपतीचे दोन दिवस समस्या होती. पण आता नियमित कचरा उचलला जात आहे.- अगस्तिन घुटे साहाय्यक आरोग्य अधिकारी.