लोखंडी पट्टी बसवून तात्पुरती डागडुजी

उरण जेएनपीटी येथून होणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील खड्डय़ाची २४ तास उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम विभागाने खड्डय़ावर केवळ लोखंडी पट्टी (प्लेट) बसविली आहे. मंगळवारी या खड्डय़ाचे डांबरीकरण करून बुझविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने दिली.

जेएनपीटी येथील वाहतुकीच्या दृष्टीने मुंब्रा बाह्य़वळण मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावरून भिवंडी, गुजरात आणि ठाण्याहून हजारो अवजड वाहने जेएनपीटीला जाण्यासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचा वापर करतात. मात्र, रविवारी या मार्गावरील ठाणे-पनवेल मार्गिकेवर तब्बल तीन फूट खड्डा पडला होता. हा खड्डा इतका मोठा होता की, या पुलाखालून जाणारी वाहनेही खड्डय़ातून दिसत होती. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी खड्डय़ाभोवती अडथळे बसविले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याची पाहणी केली. सोमवारी पहाटे अधिकाऱ्यांनी या मार्गावर एक लोखंडी पट्टी बसविली. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून येथील अडथळे काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरून रविवारपासूनच एका मार्गिकेने वाहतूक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी या खड्डय़ांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सोमवारी मतदानाचा दिवस असल्याने या मार्गावरील वाहतूक अत्यंत तुरळक होती. मात्र, मंगळवारी दुरुस्तीच्या कामामुळे येथील वाहतूक पुन्हा थांबविण्यात येण्याची शक्यता आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी या मार्गावरील रेतीबंदर येथील पायथ्याचा भाग वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. सुमारे चार महिने या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, त्यानंतरही हा मार्ग खड्डय़ात गेल्याने बांधकामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच हा भलामोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.