पिझ्झा म्हणजे आजकालच्या तरुणाईसाठी जीव की प्राण. डॉमिनोज, पिझ्झा हट्  येथील पिझ्झा प्रसिद्ध तर आहेच, पण या पिझ्झामध्ये बदल करून  त्या पदार्थाला आपला देशी हात मारून अशाच एका अफलातून पिझ्झाचा शोध लावला तो म्हणजे वसईतील हेमंत मातवणकर यांनी. त्याचे नाव म्हणजे ‘देसी पिझ्झा’

हेमंत मातवणकर यांनी दादर केटरिंग कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युनायटेड सव्‍‌र्हिस क्लब कुलाबा येथे नोकरी केली. परंतु आपला स्वत:चा उद्योग करायचा, अशी त्यांची इच्छा होती. व्यवसाय करायचा तर भांडवल नाही. त्यासाठी त्यांनी दादरहून मशरूम विकत आणून वसई-विरार येथील बाजारात पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून भांडवल जमा करून आणि वडिलांच्या मदतीने ‘पिझ्झा लिशियस’ हे आउटलेट सुरू केले.

या देशी पिझ्झाचा जन्म हा हेमंत मातवणकर यांच्या वसईतील पिझ्झालिशियस या आउटलेटमध्ये झाला. आता या पिझ्झामध्ये वेगळे काय हा प्रश्न पडला असेलच. या नावामध्येच त्याचे उत्तर आहे. देशी पद्धतीचा पिझ्झा. वसईकरांना फक्त डॉमिनोज, पिझ्झा हर्ट येथील पिझ्झा माहीत होते. मैद्याच्या बेसवर सिमला मिरची, टोमॅटो, सॉस, भाज्या आणि चीज घालून तयार केलेला म्हणजे पिझ्झा. परंतु या पिझ्झामध्ये वेगळे बदल करून, स्वादिष्ट अशी देसी चव पिझ्झामध्ये खवय्यांना मिळावी या उद्देशाने या पिझ्झाची संकल्पना आल्याचे मातवणकर यांनी सांगितले. येथे पिझ्झा बनवण्याची पद्धतही अगदी वेगळी आहे. ते बनवताना भाज्यांचा योग्य समतोल राखला जातो आणि चटकदार बनवला जातो. यामध्ये पावभाजी पिझ्झा, मशरूम पिझ्झा, मशरूम पनीर चिली पिझ्झा, चिली चटका पिझ्झा, टॅगी पिझ्झा हे देसी पिझ्झा पिझ्झालिशियसमध्ये तयार होतात. व्हेज-नॉनव्हेज या दोन्ही पद्धतीचे पिझ्झा येथे मिळत असून व्हेज पिझ्झा ७० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत आहे, तर नॉनव्हेज ८० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत या ठिकाणी लहान-मोठय़ा आकारामध्ये उपलब्ध आहेत.  या पद्धतीचा पिझ्झा फक्त वसईतील पिझ्झालिशियसमध्येच बनत असल्याने ज्यांना देशी पिझ्झा चाखायचा आहे, त्यांच्यासाठी हे हॉटेल पर्वणीच ठरणार आहे. त्यानंतर हळूहळू पिझ्झाची वाढती मागणी बघून त्यांनी वसईमध्ये पिझ्झालिशियसचे  दुसरे आउटलेट सुरू केले. त्यांच्या या व्यवसायात त्यांची अर्धागिनी ऋतुजा मातवणकर यांनी त्यांना साथ दिली.

साधारणपणे कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला विशिष्ट  पद्धतीच्या पदार्थासोबतच इतरही पदार्थ मिळतात. मात्र या हॉटेलच्या मेन्यूवर सर्वच पदार्थाना देशी लुक दिल्याचे दिसते. त्यातील नावे ओळखीची आहेत. पण ते बनवण्याच्या पद्धती देशी आहेत. पिझ्झालिशियसमध्ये पिझ्झासह बर्गर, पास्ता, गार्लिक ब्रेड, सँडविच, गार्लिक टोस्ट यांसह इतरही पदार्थ आहेत. किचनमधील सर्व साहित्य मातवणकर स्वत: विकत आणतात. त्यामुळे एखादा पदार्थ कमी असेल तर त्याच्याशिवाय मेनू तयार करत नाहीत. येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. मागणी येईल त्याप्रमाणे पदार्थ तयार केला जातो. त्यामुळे तुम्हाला नेहमी येथे गरमागरम पदार्थच मिळतात. पदार्थाची चव टिकवण्यासाठी चिकन, मटन आणि भाज्यांची साठवण न करता आवश्यकतेनुसार बाजारहाट केला जातो. त्यामुळे खवय्यांना जर या दिवाळीच्या सुरू असलेल्या सुटीत नवीन पदार्थ चाखायचा असेल तर पिझ्झालिशियसमधील देशी पिझ्झा हा सर्वोत्तम पदार्थ ठरेल.

वैशिष्टय़

  • पिझ्झालिशियास येथील देसी पिझ्झा हा चटकदार आणि चमचमीत आहे हे त्याचे मुख्य वैशिष्टय़ आहे. त्यामुळे गिऱ्हाईकाला घरात बनवलेला पदार्थ खातोय की काय असा भास होतो.
  • पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्या अधिक असते.
  • या ठिकाणी विरार, नालासोपारा, मुंबई येथील खवय्ये येऊन पिझ्झाची मागणी करतात.
  • कमी पैशात जास्त आकाराचा आणि चांगल्या दर्जाचा पिझ्झा उपलब्ध आहे.

पिझ्झालिशियस

  • कुठे : ११ डी १, मदार तेरेज अपार्टमेंट, एव्हरशाईन सिटी, वसई ईस्ट.
  • श्री गंगा अपार्टमेंट, अंबाडी रोड, वसई पश्चिम
  • वेळ : दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत.