लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ: अंबरनाथ शहरात नियोजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक जागा रूग्णालयाच्या नावे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यात आता एक टप्पा पूर्ण झाला असून यासाठी आवश्यक सुमारे २० एकर जागा वैद्यकीय शिक्षण व संशोधण संस्था, मुंबई यांच्या नावे हस्तांतरीत करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला वेग येणार आहे.

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय उभारले जाणार आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात यातील अनेक टप्पे पार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अंबरनाथच्या या शासकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या शैक्षणिक वर्षांपासून या महाविद्यालात १०० विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. या महाविद्यालयासाठी आसपासच्या शासकीय रूग्णालयांशी संलग्नता केली जाते आहे. त्याचीही प्रक्रिया सुरू आहे.

आणखी वाचा-ठाण्यात मारहाण करून तरूणाजवळील ऐवज लुटला

येथे प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरवण्याची व्यवस्था करण्यासाठी जागांचाही शोध घेतला जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला गती मिळत असतानाच आता यासाठी आवश्यक जागा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था मुंबई यांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वन विभागाने घेतला आहे. या रूग्णालयाच्या उभारणीसाठी अंबरनाथच्या पूर्वेतील सर्वेक्षण क्रमांक १६६/५ येथील आठ हेक्टर अर्थात अंदाजे २० एकर जागा रूग्णालयाच्या उभारणीसाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. या बाबतची इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया आता अटी शर्तींच्या अधिन राहून केली जाणार आहे. त्यामुळे या रूग्णालयाच्या उभारणीला गती मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे असेल रूग्णालय

अंबरनाथचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाची क्षमता सुमारे ३५० असणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सध्या अंबरनाथचे बी. जी. छाया आणि उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयाशी संलग्नता प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे. या रूग्णालयाच्या उभारणीसाठी एक कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे.