नामवंतांचे बुकशेल्फ : सकस वाचनामुळे समज आली

या पुस्तकांवरच्या विचारविनिमयातून माझी वाचनाची आवड हळूहळू वाढू लागली.

किरण येले, कवी

पुस्तकांची सोबत लहानपणापासून असली तरी बदलता काळ, वेळ आणि वयानुसार वाचन बदलत गेले. पूर्वी मी भांडुपला राहायचो. त्या वस्तीत आजूबाजूला कुणीही साहित्यिक वगैरे नव्हते. त्यामुळे मिळेल ते वाचत होतो. पुढे चेंबूर येथील एन.जी. आचार्य महाविद्यालयात शिकत असताना खऱ्या अर्थाने वाचनाची सुरुवात झाली. कॉलेजच्या दिवसांत आम्ही वर्गमित्र  ग्रुपने नाक्यावर उभे राहायचो. त्याचे दोन फायदे व्हायचे, ते म्हणजे नाक्यावर उभे राहून माणसे वाचता यायची आणि वाचलेल्या माणसांची प्रतिबिंबे उमटलेल्या पुस्तकांवर चर्चाही व्हायची. नाक्यावरच्या या मित्रांच्या घोळक्यात शेखरची ओळख झाली. तो सतत हातात पुस्तक बाळगायचा. त्या पुस्तकातील एखाद्या लेखावर किंवा कवितेवर आमचे विचारविनिमय व्हायचे. या पुस्तकांवरच्या विचारविनिमयातून माझी वाचनाची आवड हळूहळू वाढू लागली. त्यामुळे मलाही आपसूक वाटू लागले की आपण काही तरी लिहावे. मला प्रामुख्याने कविता आणि नाटकांची पुस्तके वाचायला अधिक आवडतात. कारण त्यातील भावना मनाला थेट भिडणाऱ्या असतात. अनेक जण जसे कवितेपासून लेखनाला सुरुवात करतात, तसेच माझ्याबाबतीतही झाले. मात्र मनातील सर्व भावना, विचार कवितेतून मांडता येत नाहीत, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मग मी लेख लिहू लागलो. वाचनामुळे माझे विचार प्रगल्भ होत गेले. सुरुवातीला मी हिंदीतील शेरोशायरी, मुशायरी व कविता या अधिक प्रमाणात वाचत होतो.

पुस्तकांसाठी माझ्या घरात स्वतंत्र अशी बुकशेल्फ आहे. मात्र आता पुस्तकांची संख्या वाढल्याने ती जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आता मला घराच्या खिडक्यांच्या वरही बुकशेल्फ बनवावी लागत आहे. मी अंबरनाथला राहतो. मात्र नोकरी तसेच इतर कामानिमित्त दररोज मुंबईला ये-जा करावी लागते. त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास अपरिहार्य ठरतो. मात्र ट्रेनने जाताना आणि येताना माझे पूर्णवेळ वाचन सुरू असते. त्यामुळे मला गर्दीचा त्रास जाणवत नाही आणि वाचनकलाही जोपासता येते. घरी आल्यावरही मी नित्यनियमाने वाचन करीत असतो. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवतो. मी माझ्या व्यवसायातील, कार्यालयातील तसेच इतर मित्रांनाही चांगली पुस्तके सुचवीत असतो. काही जण माझ्याकडून पुस्तके घेऊन जातात. मी काही पुस्तके मित्रांना देतो. त्यातील काही पुस्तके परत येत नाहीत. मात्र या गोष्टी मी फार मनाला लावून घेत नाही. काही चांगले वाचले की लगेच दुसऱ्याला सांगण्याचा मोह आवरत नाही. माझे ‘नो एक्झिट’ नावाचे नाटकाचे पुस्तके हरवले. त्याविषयी मात्र अजूनही मनाला चुटपुट लागून राहिली आहे. मी पुस्तकांविषयी मासिकात किंवा वर्तमानपत्रात काही वाचले तर त्याचे कात्रण काढून माझ्या संग्रहात ठेवीत असतो. सादत हसन मंटो या लेखकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. फाळणीनंतर झालेल्या परिस्थितीचे अतिशय विदारक आणि प्रत्यकारी चित्रण त्यांच्या कथांमधून आढळते. काही पुस्तके ही खऱ्या अर्थाने हिप्नोटाइज करीत असतात. मी विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवारांची नाटके वाचली आहेत. त्यातील काही संहिता माझ्या संग्रहातही आहेत. मी आजवर सिल्विया प्लाथ यांच्या कविता, मिलिंद कुंदेरा यांचे ‘लाफेबल लव्ह’, जे.डी. सलिंगर यांचे ‘नाईन स्टोरीज’, जोस सरमागो यांचे ‘ब्लाइंडनेस’, जेन पॉल सारत्रे यांचे ‘नो एक्झिट’ यांसारख्या इंग्रजी कादंबऱ्या व पुस्तके वाचली आहेत. सादत हुसेन मंटो, राजेश जोशी यांचे ‘दो पंक्तियों के बीच’, दुष्यन्त कुमार यांचे ‘साये मे धूप’, धूमिल यांचा ‘संसद की सडक तक’ हा कवितासंग्रह, गिरीश कर्नाड यांचे ‘हयवदन’ हे नाटक, राजेंद्र यादव की कहानियाँ, यशपाल यांचा ‘फुलों का कुर्ता’ यांसारखा कथासंग्रह ही पुस्तके मी वाचलेली आहेतच, शिवाय ती माझ्या संग्रहातही आहेत. तसेच मराठीमध्ये भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी तसेच ‘हिंदू’, वसंत आबाजी डहाके यांचा ‘चित्रलिपी’ हा कवितासंग्रह, सतीश काळसेकर यांचे ‘इंद्रियोपनिषद’, मंगेश पाडगावकरांचा ‘बोलगाणी’ कवितासंग्रह, महेश एलकुंचवारांचे ‘वासांसि जीर्णाणि’ हे नाटक तसेच पु. शी. रेगे यांची ‘मातृका’सारखी अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. रंगनाथ पठारे यांच्या कथा, अरुण म्हात्रे, अशोक नायगांवकर यांच्या कविताही मी आवडीने वाचतो. आता किंडलसारखी वाचनाची निरनिराळी साधने उपलब्ध असली तरी मला मात्र पारंपरिक पद्धतीने पुस्तक हातात घेऊन वाचायलाच आवडते. कारण त्यातला शाईचा सुगंध मला अधिक भावतो. दुसरे असे की, यंत्रातून इतके पोहोचत नाही जितके पुस्तकातून पोहोचते. आपले वाचन केवळ मराठीपुरतेच मर्यादित ठेवू नये. इंग्रजी तसेच हिंदीतील साहित्यातही डोकवावे, असे मला वाटते. हिंदीमध्येही ‘नया ज्ञानोदय’, कथालेखसारखी अनेक मासिके आहेत, तीही नव्या पिढीने वाचायला हवीत. वाचक वर्ग वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, तेव्हाच वाचनसंपदा समृद्ध होईल. भाषेमुळे व्यक्ती लिहिती होते आणि त्याचसोबत त्याच्या लिखाणात प्रगल्भताही येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Poet kiran mule bookshelf