बदलापूर: अवैधरित्या देशी बनावटीची अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी भाजपाचे माजी स्वीकृत नगरसेवक शरद म्हात्रे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, या घटनेने बदलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, बारवी धरण रस्त्यावर एक व्यक्ती दोन देशी अग्निशस्त्रे घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री वालीवली परिसरात पथकाने सापळा रचला. या वेळी दशरथ कांबरी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी अग्निशस्त्र सापडले. चौकशीत दुसरे अग्निशस्त्र बदलापूरमधील शरद म्हात्रे यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले.

यानंतर पोलिसांनी शरद म्हात्रे यांनाही अटक केली. तसेच कांबरी याला दोन्ही अग्निशस्त्रे पुरवणारा हरेश भोपी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांकडून दोन देशी अग्निशस्त्रे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आली होती याचा तपास सुरू आहे. दरम्यान, तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.